उन्हाच्या तीव्रतेमुळे रसाळ फळांना पसंती
बेळगाव : दिवसभर ऊन आणि रात्री, पहाटे काहीशी थंडी असे सध्याचे विचित्र वातावरण पाहावयास मिळत आहे. या वातावरणाला उन्हाळा म्हणावा की हिवाळा, असा प्रश्नही पडू लागला आहे. असे असले तरी बाजारात रसाळ फळांची आवक वाढू लागली आहे. विशेषत: टरबूजची (फुट्टे) आवक वाढत आहे. साधारण उन्हाळा सुरू झाला की टरबूजची आवक सुरू होते. मात्र यंदा मार्चच्या सुरुवातीस आवक दिसत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने रसाळ फळांची मागणीही वाढू लागली आहे. बाजारात टरबूज, संत्री, कलिंगड, अननस, मोसंबी आदी फळांची रेलचेल दिसत आहे. त्याबरोबर गांधीनगर येथील होलसेल फ्रूट मार्केटमध्ये तसेच किरकोळ बाजारात देखील टरबूजची विक्री होऊ लागली आहे. साधारण 30 ते 100 रुपयांपर्यंत टरबूजचा दर आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याने फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: कलिंगड, संत्री, अननस, मोसंबी आदी फळांना पसंती दिली जात आहे. त्याबरोबर शहरातील विविध भागात टरबूजची विक्री सुरू झाली आहे. शहरासह उपनगर आणि चौकाचौकात देखील विक्री होऊ लागली आहे. उन्हाळा जसजसा वाढेल तसतशी मागणी देखील वाढणार आहे.









