बी. टी. पाटील/ शित्तुर वारु
शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर – वारुण, उखळू येथील नयनरम्य, मनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. शाहूवाडी उत्तर भागातील कांडवण, चांदोली धरण, जागतिक वारसा लाभलेले चांदोली अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, विविध वनस्पती, धबधबे, विलोभनीय वारणानदीचे दुथडी भरुन वाहनारे पात्र, समोर पवनचक्कींनी व्यापलेले गुढेपाचगणी पठार, हिरवाईने नठलेले डोंगर दऱया, थंड हवा व सोबतीला अधूनमधून दाट धुक्याची चादर, डोकावणारा सप्तरंगी इंद्रधणु अशी निसर्गाने या भागावर मुक्तहस्ते उधळण केली आहे. असे अनेक नजरा दृष्टीत साठविण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने शाहूवाडी उत्तर भागात दाखल होत आहेत.
उखळू येथील 300 फुटांवरुन कोसळणारा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मात्र पर्यटन विकास महामंडळ व जिल्हा यंत्रणेने या धबधब्याच्या विकासाबाबत ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हा धबधबा पर्यटनापासून दुर्लक्षित आहे. उखळू गावापासून अवघ्या दोन किमी अंतरावर हा धबधबा आहे. जाण्यासाठी रस्ता नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेतल्याशिवाय धबधब्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. याशिवाय डोंगर कपारीतून निसरडी पाऊल वाट, वाटेत रक्त शोषणारे जळूंचे साम्राज्य, सोसाटय़ाचे वारे अशा संकटांना सामोरे जावून धबधब्यापर्यंत पोहचावे लागत आहे.









