गढूळ पाण्याबाबतच्या तक्रारीनंतर आमदार डॉ. देविया राणे यांचे आदेश
जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव
प्रतिनिधी/ वाळपई
केरी सत्तरीत धारणातील गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षापासून केरी भागातील लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. विहिरीवर खास पंप बसवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा अशी मागणी स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांच्याकडे करण्यात आली. याची त्यांनी गंभीर दखल घेऊन पाणीपुरवठा विभागामार्फत अनेक ठिकाणी विहिरीवर पंप बसवून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सध्या धरणाने तळ गाठला आहे. तर वाळवंटी नदीपात्र आटले असून केवळ त्यातील डबक्यांत पाणी साठलेले दिसत आहे. धरण प्रकल्पाच्या माध्यमातून केरी शुद्धीकरण प्रकल्पाला पुरवठा होणाऱ्या पाण्यात लोह तत्वाचे प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.
गढूळ पाण्यामुळे केरी भागातील नागरिक कंटाळले
अंजुणे धरणाचे जलाशया बहुतांश कोरडे पडलेले आहे. त्यातील डबक्यांत शिल्लक असलेले पाणी पूर्णपणे गढूळ आहे. त्याचप्रमाणे वाळवंटी नदीच्या पात्रातही खडखडाट आहे. यामुळे केरी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागलेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हेच पाणी केरी भागातील नागरिकांना नळाद्वारे पुरविले जाते. त्यामुळे या भागातील नागरिक गढूळ पाण्याला कंटाळलेले आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
पाण्यात लोह जास्त असल्यामुळे आरोग्याला बाधक
दरम्यान गेल्या पाच वर्षापासून धरण प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा केरी पाणी प्रकल्पाला करण्यात येत असतो. यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून सदर पाणी नागरिकांना नळाच्या माध्यमातून पुरविण्यात येत असते. मात्र गेल्या पाच वर्षापासून या भागांमध्ये सातत्याने गढूळ पाणी येऊ लागलेली आहे. त्यानंतर या पाण्याची तपासणी करण्यात आल्यानंतर या पाण्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोह तत्व असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामुळे अशा प्रकारचे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे बनण्याची शक्यता आहे.
आमदार डॉ. देविया राणे यांच्याकडे मांडली कैफियत
दोन दिवसांपूर्वी या भागामध्ये होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्याबाबत मुद्दा नागरिक व पंच सदस्यांनी आमदार डॉ. देविया राणे यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळी ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आमदारांसमोर केली होती. त्यानुसार या भागातील जुन्या विहिरी साफ करून त्यावर पंप बसवा व नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्याचा पर्याय आमदार डॉ राणे यांनी मान्य केला व त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केली.
पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
आमदारांनी आदेश दिल्यानंतर पाणीपुरवठा कार्यालयाचे वाळपई विभागाचे साहाय्यक अभियंता मदन देसाई, कनिष्ठ अभियंता गणेश गावकर यांनी सरपंच दीक्षा गावस, पंच सदस्य नंदिता गावस, संदीप ताटे, श्रीपाद गावस, राजेश गावस, तन्वीर पागंम, उस्मान सय्यद, भिवा गावस, सुप्रिया गावस आदींच्या समवेत विविध ठिकाणच्या विहिरींची पाहणी केली. दुरुस्ती व साफसफाईबाबतचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविला जाणार आहे. येथील पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येणार आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंप बसविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, अहवाल काहीही आला तरी आम्हाला ते गढूळ पाणी नकोच असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे









