गळती निवारणाकडे दुर्लक्ष : जनतेत नाराजी
बेळगाव : लक्ष्मीपूजनासाठी बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात गर्दी झाली असतानाच गणपत गल्ली येथे पाण्याच्या व्हॉल्व्हमधून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गणपत गल्ली कॉर्नरवरच पाणी वहात असल्याने नागरिकांना या पाण्यामधूनच ये-जा करावी लागत होती. वाहनांमुळे रस्त्यावरील पाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत होते. गणपत गल्लीच्या प्रवेशावरच वरचेवर पाण्याची गळती होत असते. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी मोठा ख•ा खणून जलवाहिनीची गळती काढण्यात आली होती. रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सकाळपासूनच गणपत गल्ली परिसरात नागरिकांची गर्दी होती. त्यातच व्हॉल्व्हमधून पाणी वहात असल्याने संपूर्ण परिसरात चिखल झाला होता. हे पाणी उतारावरून गणपत गल्लीच्या मध्यापर्यंत गेले होते. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना या चिखलामधूनच ये-जा करावी लागत होती. बेळगावमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची गळती असूनही एल अँड टी कंपनीकडून वेळच्यावेळी दुरुस्ती केली जात नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा मर्यादित साठा असल्याने पाणी जपून वापरा, असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मात्र पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळेच शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार घडत आहे.









