मनपा-पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष
बेळगाव : अनगोळ, उद्यमबाग रस्त्यावरील केएलई इंजिनिअरींग कॉलेजसमोरच असलेल्या पाण्याच्या व्हॉल्वमधून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या या व्हॉल्वमधून पाणी जात आहे. सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून अशाप्रकारे पाणी वाया जात असल्याने महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या राकसकोप तसेच हिडकल जलाशयामधील पाण्याने तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत शहरामध्ये अशाप्रकारे पाणी वाया जात असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र त्यांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या परिसरात पाणीपुरवठा करताना तो योग्यप्रकारे केला जात नाही. काही भागात कमी दाबाने तर काही भागात अधिक प्रमाणात पाणी सोडले जाते. असे असताना अशाप्रकारे पाणी दररोज शेकडो लिटर वाया जात असून ते पाणी गटारीत जात आहे. तेंव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.









