एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती : वेळीच पाऊस न पडल्यास मात्र गंभीर समस्या
प्रतिनिधी/ बेळगाव
पाऊस हुलकावणी देऊ लागला आहे, तसतसे पाणीटंचाईचे संकट तीव्र होत आहे. राकसकोप जलाशयातील डेडस्टॉक उपसण्याचे संकेत दिसू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 5 जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी माहिती दिली आहे. परंतु वेळीच पाऊस न पडल्यास मात्र गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे त्यांनी सांगितले.
सध्या संपूर्ण शहराला पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. एलअॅण्डटीने पाणीपुरवठा नियोजनातही बदल केला आहे. कंपनीतर्फे 3, 4 आणि 5 दिवसांनी विविध भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. संभाव्य संकट लक्षात घेऊन आता 4, 5 आणि 6 दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जरी एलअॅण्डटी कंपनी असे सांगत असली तरी शहराच्या बहुतेक भागात 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विहिरींनीही तळ गाठला असून त्याचीही झळ नागरिकांना बसू लागली आहे.
विहिरींचे पाणी दूषित
दरम्यान बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजचे पाणी विहिरीत मिसळल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे त्या विहिरींचे पाणी निरर्थक ठरते आहे. मुख्य म्हणजे एकीकडे अशी टंचाई जाणवत असताना दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागण्याचे सत्र सुरूच आहे.
नागरिकांनाही गांभीर्याने पहावे
नागरिकांनाही अद्याप याचे गांभीर्य लक्षात आलेले आहे, असे वाटत नाही. पाणीटंचाईच्या अनेक टीप्स देऊनही अद्यापही पाईप लावून रस्ता धुणे, वाहने धुणे हे प्रकार पहायला मिळतात. याबाबत जर संबंधितांना पाणीटंचाईबाबत कल्पना दिली असता तुमचा काय संबंध? असा प्रश्न बिनदिक्कत केला जातो. सध्याच्या परिस्थितीत वाहन ओल्या कपड्यांनी पुसता येते. स्वयंपाक घरातील टाकाऊ पाणी झाडांना घालता येते. परंतु तशी मानसिकता जनमानसात दिसत नाही.
बंद कूपनलिकांची दुरुस्ती करणे गरजेचे
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शहरात 786 कूपनलिका, 68 विहिरी व 139 हातपंप आहेत. त्यांचा वापर याकाळात करता येवू शकतो. मात्र तत्पूर्वी बंद कूपनलिकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सध्या 47 कूपनलिका बंद असून 13 कूपनलिकांची दुरुस्ती सुरू आहे. 120 हातपंप बंद असून त्यापैकी 87 हातपंपांची दुरुस्तीही सुरू आहे. पुन्हा यातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी करणेही आवश्यक आहे. पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता सध्या पाण्याचा थेंबन्थेंब वाचविणे आवश्यक असून त्याबाबतीत जागृती करणे आवश्यक आहे.