द्रव पदार्थ फेकणाऱ्या बस मार्शलला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी पदयात्रेदरम्यान पाणीसदृश द्रव पदार्थ फेकल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रा सुरू असताना घडली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी एका बस मार्शलला द्रव पदार्थ फेकल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. अशोक झा नावाच्या व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘पाणी’ फेकण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. संबंधित इसम खानापूर डेपोमध्ये बस मार्शल म्हणून कार्यरत आहे. या कृत्यामागील कारणे शोधण्यासाठी अशोक झा याची अधिक चौकशी सुरू आहे.
अरविंद केजरीवाल पदयात्रेत सहभागी लोकांशी हस्तांदोलन करत असताना त्यांच्यावर पाणी फेकण्याची घटना घडली. याप्रसंगी पोलीस कर्मचारी जवळच असल्याने संबंधिताला लगेचच ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने भाजपवर हल्लाबोल केला आहे. आरोपी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. ‘आज भरदिवसा, भाजपच्या एका कार्यकर्त्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. ‘दिल्लीची निवडणूक तिसऱ्यांदा हरल्याने भाजपला खूप चिंता वाटत आहे. अशा गैरकृत्यांचा बदला दिल्लीतील लोक घेतील’, असे आतिशी म्हणाल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.









