कॅन्टोन्मेंट बोर्डसमोर आव्हान, पथदीप विद्युत बिलाची रक्कम 4 कोटी : अडीच कोटीचे पाणी बिल भरावे लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
अडीच कोटीची थकबाकी असल्याने ही रक्कम भरण्याचे आव्हान कॅन्टोन्मेंट बोर्डसमोर उभे ठाकले आहे. बिलाची रक्कम अदा करण्यासाठी यापूर्वी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण सभागृहातील सदस्य आणि नागरिकांच्या विरोधामुळे पाणीपट्टीत वाढ करण्यात आली नाही. मात्र बिलाच्या रकमेचा डोंगर वाढत चालल्याने पाणीपट्टी वाढविणे अपरिहार्य असल्याचे निदर्शनास आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी दिला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून निधी देण्यात आला नाही. 6 वर्षांपासून केंद्र शासनाने निधी देण्याचे बंद केले आहे. 2011 पासून राज्य शासनाने निधी दिला नाही. त्यामुळे विकासकामे राबविणे मुश्कील बनले आहे. कॅन्टोन्मेंटला मिळणाऱया महसुलातून विविध विकासकामे राबविण्यात आली होती. मात्र निधीविना अनेक विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. शासनाकडून निधी मिळाला नसल्याने पथदीपांच्या विद्युत बिलाची रक्कम आणि पाणी बिलाची रक्कम थकली आहे.
पथदीपांच्या विद्युत बिलाची रक्कम 4 कोटी झाली असून ही रक्कम भरण्यासाठी हेस्कॉमने तगादा लावला होता. पण थकलेली रक्कम कॅन्टोन्मेंटने भरली नसल्याने पथदीपांचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला होता. राज्य शासनाकडे पाठपुरावा करून एसएफसी अनुदान मंजूर करून घेण्यात आले आहे. या अंतर्गत मिळणाऱया अनुदानातून विद्युत बिलाची रक्कम भरली जाईल, असे हेस्कॉमला सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बेंगळूर येथे वरि÷ अधिकाऱयांची भेट घेऊन पथदीपांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे पथदीपांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र 8 दिवसांतच कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा एल ऍण्ड टी ने तोडला होता.
दोनवेळा पाणीपट्टी वाढीस विरोध
कॅन्टोन्मेंट परिसरात दर तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणीपट्टीचे बिल अदा केले नसल्याच्या कारणास्तव एल ऍण्ड टी कंपनीने पाणीपुरवठा तोडला होता. 15 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने कॅन्टोन्मेंटवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. त्यामुळे महिलावर्गाने कॅन्टोन्मेंटवर मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र कॅन्टोन्मेंटला अडीच कोटीचे पाणी बिल भरावे लागणार आहे. बिलाच्या रकमेचा आकडा वाढत चालल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बैठकीच्या अजेंडय़ावर घेतला होता. दोनवेळा पाणीपट्टी वाढीस विरोध करण्यात आला. तीन दिवसाआड पाणीपुरवठा करूनही प्रतीमहिना केवळ 100 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. महापालिकेच्या तुलनेत ही पाणीपट्टी खूपच कमी आहे. प्रतिमहिना 175 रुपये प्रत्येक नळधारकांकडून आकारले जातात. त्यामुळे पाणीपट्टी वाढीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने विचार चालविला आहे. थकलेली बिलाची रक्कम पाहता पाणीपट्टी वाढ अपरिहार्य असल्याचे निदर्शनास आले आहे.









