पाण्याच्या मागणीसाठी महिला रस्त्यावर : पाणीपुरवठा खात्याचा नोंदविला निषेध
प्रतिनिधी / म्हापसा
गेल्या काही दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस पडत असूनही म्हापसा शहरासह बार्देशवासीयांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागतोय. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पातील मुख्य जलवाहिनीत बिघाड झाल्याने ही समस्या ओढवल्याचे समजते. विशेष म्हणजे तीन दिवसांनी आज बुधवारी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा करण्यात आला खरा मात्र तो मुबलक नव्हता. शिवाय गढूळ पाणी येत होते. सायंकाळी पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे काही भागात पाणीपुरवठा झालाच नाही. दरम्यान आल्तिनो म्हापसा येथे गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्देशात मागील तीन दिवसांपासून सुरू झालेले पाणी टंचाईचे संकट आज किंचित दूर झाले असले तरी गढूळपणा कायम होता. तालुक्यातील बऱ्याच भागात मर्यादित पाणीपुरवठा करण्यात आला. सध्या तिळारीतून होत असलेला पाणीपुरवठा गढूळ असल्याचे पाण्याच्या शुद्धीकरणात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनानुसार करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. म्हापसा पालिका क्षेत्रासह शिवोली, साळगावमधील काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, नादुऊस्त झालेली वाहिनी दुऊस्त करण्याचे काम सुरू होते.
मागील सहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दररोज पदरचे पैसे मोडून टँकर मागवावा लागत आहे. विकासाच्या बाता मारणाऱ्या सरकारला लोकांना पाणी देणे जमत नाही. मग सरकार
कसला विकास साधणार, असा सवाल म्हापसा आल्तिनो येथील नागरिक अॅनी परेरा यांनी केला.
म्हापसा शहरातील अनेक भागात आज सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा झाला पण सायंकाळी तो पुन्हा ठप्प झाला. दुसरीकडे आल्तिनो–म्हापसा येथे मागील सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. जवळपास 35 कुटुंबीयांना हा फटका बसला आहे. त्याचा निषेध म्हणून काल बुधवारी सायंकाळी या संतप्त महिला रस्त्यावर पाण्याच्या बादल्या घेऊन रस्त्यावर उतरल्या. ‘आमका जाय…आमका जाय..उदक आमका जाय…’ अशा घोषणा देत त्यांनी व साबांखा पाणीपुरवठा विभागाचा निषेध केला.









