बेळगाव : शहराला 24 तास पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी एलअँडटीकडून जलपुंभ उभारण्यासह जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मृत्युंजयनगर अनगोळ येथे जलकुंभाचे काम पूर्ण होण्याआधीच त्याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यानंतर टेस्टिंगचे काम हाती घेण्यात आले असल्याने जलपुंभाला सर्वत्र गळती लागल्याचे दिसून येत आहे. पण ही गळती नसून नवीन जलकुंभाची टेस्टिंग प्रक्रिया सुरू असल्याचे एलअँडटी कंपनीचे व्यवस्थापक धिरज उभयकर यांनी सांगितले. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीवर सोपविण्यात आली असल्याने गल्लीबोळात जलवाहिनी घालण्यासह घरोघरी नळ कनेक्शन दिले जात आहे.
तसेच विविध ठिकाणी नवीन जलपुंभही उभारले जात आहेत. यापूर्वी वडगाव आणि कणबर्गी येथील जलकुंभांचे लोकार्पण करण्यात आले आहे. या जलकुंभांना रंग लावण्यापूर्वीच त्यांचे टेस्टिंग करण्यात आले होते. मात्र मृत्युंजयनगर अनगोळ येथील जलपुंभाची टेस्टिंग करण्यापूर्वीच रंगाची निवड करण्यासाठी केयूआयडीएफसीने रंग लावण्याची विनंती केली होती. त्यामुळे जलपुंभाला निळा रंग लावण्यात आल्यानंतर टेस्टिंग करण्यात आले. टेस्टिंगदरम्यान विविध ठिकाणी गळती लागल्याचे दिसून आले. रंग काम करण्यात आल्याने नवीन जलकुंभाला गळती लागल्याची चर्चा शहर व परिसरात सुरू झाली. पण जलकुंभाला गळती लागली नसून टेस्टिंग काम सुरू असल्याचे एलअँडटी अधिकाऱ्यांनी सांगितले.









