खणगावजवळ पाईपलाईन फुटली : एलअॅण्डटीकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती
प्रतिनिधी/ बेळगाव
हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खणगावजवळ फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात दोन दिवस व्यत्यय निर्माण होणार आहे. एलअॅण्डटी कंपनीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे.
शहराच्या दक्षिण भागात मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव या भागामध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर उत्तर भागामध्ये सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अंजनेयनगर, माळमारुती एक्स्टेन्शन, गांधीनगर, कणबर्गी, न्यू गांधीनगर, कुडची, वीरभद्रनगर, एनईएस कॅन्टोन्मेंट, हिंडाल्को, डिफेन्स एरिया, केएआयडीबी, केएलई, बिम्स व आरसीनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही, असे मंडळाने कळविले आहे.
ऐन उन्हाळ्यात आधीच पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे. अशातच पाईपलाईनला मोठेच भगदाड पडल्याने पाणीपुरवठा होणे कठीण झाले आहे. अनेक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. उष्मा वाढतो आहे. त्यामुळे पाण्याची गरज अधिक भासते आहे. अशा परिस्थितीत पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीटंचाईचे संकट उद्भवणार आहे.









