कंग्राळी बुद्रुकमधील नेताजी गल्ली – लक्ष्मी गल्लीतील नागरिकांचे पाण्यासाठी हाल
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ला घरोघरी नळाला 24 तास पाणीपुरवठ्यासाठी शासकीय निधीतून 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून नवीन पाईपलाईन घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच गावकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे नियोजन चुकीचे ठेवल्यामुळे नेताजी गल्ली व लक्ष्मी गल्लीतील नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. ग्रा. पं. ने पाईप लाईन खोदाईचे काम संपवून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ला शासकीय निधीतून 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पूर्वी 8 ते 10 दिवसातून एकदा नळाला पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे नागरिकांनी 8 ते 10 दिवस शिळ्या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु आता या योजनेमुळे घरोघरी 24 तास पाणी मिळणार आहे. यामुळे खास महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु नवीन पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी सोडण्याचे नियोजन चुकीचे होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबर इतर दैनंदिन वापरासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ट ँकरने पाणीपुरवठा
24 तास घरोघरी नळाला पाणी मिळण्याच्या पाईपलाईन खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे पूर्वीच्या नळाला पाणी सोडण्याचे ग्रा. पं. चे नियोजन चुकीचे झाले असल्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. परंतु ग्रा. पं. ने सहानुभूती म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. सदर पाणी पुरवठा धिम्यागतीने सोडण्यात येत आहे.
सायकल, दुचाकीवरून पाणी वाहतूक
गावातील लक्ष्मी गल्लीतील नेताजी गल्लीमधील नागरिकांना प्रामुख्याने नळावरील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. विहिरींचेही पाणी वापरायला योग्य नसल्यामुळे नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. त्यातच 15 दिवसांपासून नळाला पाणीच नसल्यामुळे सायकल किंवा दुचाकीवरुन पाणी आणण्याची वेळ आली आहे.









