जलवाहिन्या घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने परवानगी दिली नसल्याने एलऍण्डटीने पाणीपुरवठा तोडल्याचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
पंधरा दिवसांपासून एलऍण्डटीने कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद केल्याने कॅन्टोन्मेंट परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिलाचे कारण पुढे करून पाणीपुरवठा बंद केला असला तरी यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी दिली नसल्यानेच पाणीपुरवठा बंद केला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याने विद्युतबिलाची आणि पाणीबिलाची रक्कम भरणा केली नाही. परिणामी कधी विद्युतपुरवठा तर कधी पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. याबाबत कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे विचारणा करून पाणी कमी येत असल्याचे सांगितले होते. तर एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी प्रारंभी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे कारण दिले होते. त्यानंतर थकीत बिल भरण्याची सूचना करून पाणीपुरवठय़ात कपात केल्याचे सांगितले.
पाणी बिलाची रक्कम भरण्याची तयारी कॅन्टोन्मेंट बोर्डने दर्शविली आहे. तरीदेखील एलऍण्डटीचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यास सहकार्य दर्शवित नाहीत. पाणी बिलाची रक्कम थकली असल्याचे कारण देऊन पाणीपुरवठा बंद केला आहे. पण यामागचे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत शहरातील सोळा उपनगरांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी एलऍण्डटीने आटापिटा चालविला आहे. मात्र लक्ष्मीटेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून दक्षिण भागात असलेल्या जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालणे आवश्यक आहे. ही जलवाहिनी कॅन्टोन्मेंट परिसरातून घालण्यात येणार आहे. त्याकरिता रस्ता खोदाई करणे आवश्यक असून एलऍण्डटी कंपनीने यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे रस्ता खोदाईसाठी परवानगी मागितली होती. कॅन्टोन्मेंट
अट मान्य करूनही कॅन्टोन्मेंटने परवानगी दिली नाही
बोर्डने हा विषय दोनवेळा बैठकीच्या अजेंडय़ावर घेतला होता. पण जलवाहिनी घालण्याकरिता रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिली नाही. महापालिका आयुक्त आणि एलऍण्डटीच्या अधिकाऱयांनी कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी तसेच विद्यमान अध्यक्ष ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. यावेळी उत्तर विभागाचे आमदारदेखील बैठकीला उपस्थित होते. रस्ते खोदल्यानंतर दुरुस्त करून देण्याची सूचना एलऍण्डटीला करण्यात आली होती. रस्ते व्यवस्थित करून देण्याची अट मान्य करूनही कॅन्टोन्मेंटने जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी दिली नाही. या कारणास्तव कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा तोडण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद करण्यामागे केवळ महापालिका आयुक्त, एलऍण्डटी कंपनी आणि राजकीय व्यक्तींचा हात असल्याची टीका नागरिकांनी गुरुवारच्या मोर्चावेळी केली.
पाणीपुरवठा बंद करून कायद्याचे उल्लंघन…
पाणी, हवा आणि नागरी सुविधा बंद करता येत नाहीत. तरीदेखील सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी संस्थेने कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद करून कायद्याचे उल्लंघन केल्याची टीका होत आहे. याबाबत कॅन्टोन्मेंटने एलऍण्डटीला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पत्र दिले आहे. पाणीपुरवठा न केल्यास जनहितासाठी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









