विविध भागात 4 ते 5 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाणीटंचाईची समस्या
बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी एलअॅण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आल्यापासून शहर व उपनगरांतील पाणीपुरवठा नियोजनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. विविध भागात 4 ते 5 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दुऊस्तीची कामे वेळेवर होत नसल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 24 तास पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या विविध भागात 4 ते 5 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. पाणी समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. उपनगरात 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. पण या भागातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. सर्वच भागात ही समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहराच्या अन्य भागात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सध्या राकसकोप जलाशयात मुबलक साठा आहे. तरीदेखील शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही भागात 5 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच कूपनलिकांचे विद्युतपंप खराब झाले असून, दुऊस्ती करण्याकडे एलअॅण्डटी कंपनीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत आणखी भर पडली आहे. चार दिवसाआड करण्यात येणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. तर विविध ठिकाणी असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी केला जातो. पण दोन्ही पाणी बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एलअॅण्डटी कंपनीकडे जबाबदारी सोपविल्यापासून शहरातील पाणीपुरवठा नियोजनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. कंपनीतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा आणि बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना बसत असल्याची टीका होत आहे. तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पण त्या ठिकाणी तक्रार केली असता कोणताच प्रतिसाद मिळत नाही. कूपनलिकांच्या विद्युतपंपांच्या दुऊस्तीसाठी तक्रारी करूनही कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे काही भागातील कूपनलिका काही महिन्यांपासून बंद आहेत. विचारणा केली असता सर्वच अधिकारी एकमेकाकडे बोट करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
एलअॅण्डटीच्या अटी-नियमावलीमुळे दुऊस्तीची कामे करण्यास विलंब
एलअॅण्डटी कंपनीच्या अटी व नियमावलीमुळे दुऊस्तीची कामे करण्यास विलंब होत आहे. कंपनीकडून दुऊस्तीचे काम वेळेवर होत नसून गळती निवारणासाठी चार ते पाच दिवसांचा वेळ घेतला जात आहे. याचा फटका शहरवासियांना बसत आहे. परिणामी शहरवासियांना पाणीटंचाईच्या समस्या भेडसावत आहेत. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी एलअॅण्डटी कंपनीने नियमात बदल करून कामकाज करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.









