शहरवासियांना पाण्यासाठी करावी लागतेय कसरत : एलअँडटी कंपनीच्या कारभाराबद्दल संताप
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. मात्र पाणीपुरवठ्याबाबत भरपूर तक्रारी वाढल्या असून दुऊस्तीच्या नावाखाली दोन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने शहरवासियांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महिन्याभरात 15 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून शहरवासियांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात पाणीटंचाईची समस्या खूपच वाढली असून दर आठ दिवसांतून एकदा दुऊस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. दुऊस्तीचे काम निघाल्यास दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याचे पत्रक एलअँडटी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे. एलअँडटीकडून दुऊस्तीची कामे करण्यात येत आहे की, पाणी कपात केली जात आहे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पाणीपुरवठा बंद ठेवल्याने शहरवासियांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याशिवाय कोणतेच कामकाज चालत नाही. दैनंदिन कामासाठी पाणी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एलअँडटी कंपनीला महिन्याचे पाणीपट्टी भरूनदेखील टँकरला पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एलअँडटी कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जानेवारी महिन्यात दि. 19 रोजी दुऊस्तीच्या कामासाठी सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर हिडकल जलवाहिन्यांच्या दुऊस्तीकरिता दि. 30 जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने दि. 30, 31, व 1 फेब्रुवारी असे तीन दिवस शहरवासियांना पाणी मिळाले नाही. त्यानंतर दि. 8 फेब्रुवारी रोजी दुऊस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. 6 ते 8 तास दुऊस्तीचे काम चालणार असल्याचे सांगून दि. 9 रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पत्रक एलअँडटीने प्रसिद्ध केले होते. मात्र त्यावेळीदेखील सलग दोन दिवस शहरवासियांना पाणी मिळाले नाही. त्यानंतर आता पुन्हा मागील आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता. तुम्मरगुद्दी आणि कुंदरगी या पंपहाऊसजवळ हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने दुऊस्तीचे काम गुऊवार दि. 16 रोजी घेण्यात आले आहे. त्याकरिता दि. 17 आणि 18 रोजी विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकंदर महिन्याभरात 15 दिवसांहून अधिक पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार दुऊस्तीच्या कारणाखाली पाणीपुरवठा बंद ठेऊन शहरवासियांना वेठीस धरण्याचा प्रकार चालविला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रकार नेहमीचाच बनला असून पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी कपात धोरण राबविले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरवासियांची गैरसोय थांबविण्यासाठी सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.









