पाणीटंचाईने बळी घेतलेल्या दीपा पावले यांच्या निधनाने एकच धक्का : एलअॅण्डटीच्या कारभाराबाबत संताप
बेळगाव : पाण्याने तिचा बळी घेतला… आता कुटुंबीयांच्या डोळ्यांतील पाणी मात्र थांबता थांबत नाही… तिच्या लेकी दिङ्ग्मूढ अवस्थेत आहेत… तिचे पालक सुन्न झालेत. पतीला काहीच सुचेनासे झाले आहे….त्यांच्यासमोर आता आहेत फक्त प्रश्न प्रश्न आणि प्रश्न…दुर्घटना घडली म्हणजे प्रशासन दखल घेणार, पाणी सोडण्याचे आश्वासन देणार, आगामी उद्दिष्टे लक्षात घेऊन नेते जाऊन सांत्वन करणार. परंतु सर्व काही ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ ठरणार. ‘आमची आई, आमची लेक परत आणणार का?’ या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणीच देऊ शकणार नाही.
पाण्याने बळी घेतलेल्या दीपा पावले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. गल्लीतील महिला हळहळत आहेत आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीच्या नावाने होळी आधीच शिमगा करीत आहेत. शहराचा पाणीपुरवठा ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. दुर्दैवाने अधिकतर कुटुंबांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन महिलाच करीत आहेत. पाणीटंचाईचा सामना त्याच करतात, त्यासाठी वणवणही त्यांनाच करावी लागते. धुण्या-भांड्यांची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय महिला नेहमीच काटकसरीचा मंत्र जपत असतात. त्यामुळे पाणीसुद्धा त्या काटकसरीनेच वापरतात.
य् ााच पाण्यामुळे दीपा यांचा बळी गेला. कोनवाळ गल्ली येथे त्या राहतात. या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. चार जिने चढून टेरेसवरील पाण्याच्या टाकीत किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी त्यांची मुलगी लेखना शिडीवरून वर चढली. मात्र तिच्या अंगात कणकण असल्याने आपल्याला गरगरते आहे, असे तिने आईला सांगताच दीपा यांनी तिला उतरवून त्या स्वत: वर चढल्या. ट ाकी उंचावर असून त्याच्या बाजूने प्लास्टिकचा पत्रा घालण्यात आला होता. दुर्दैवाने आंघोळीला जाण्यापूर्वी टाकीत पाणी किती आहे, याचा अंदाज घेण्यासाठी त्या गेल्या. आणि पुढचे सर्व अंदाज चुकले. प्लास्टिकच्या पत्र्यावर त्यांचा पाय पडला आणि पत्रा फुटून त्या वरून 50 फूट खाली कोसळल्या. मुलीच्या समोरच ही घटना घडल्याने तिला जबर धक्का बसला आहे. जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. अर्थात इस्पितळात नेल्यावर डॉक्टरांनी हे सत्य जाहीर केले. बुधवारी सकाळी सदर प्रतिनिधींनी पावले कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हा एकच हल्लकल्लोळ सुरू होता. अशी काही घटना घडूच शकते यावरच कोणाचा विश्वास बसत नव्हता. दीपा यांचे आई-वडील हतबल आणि सुˆ होऊन बसले आहेत. मुलींच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला आहे. माणसाला अपघाती मृत्यू येतो, नैसर्गिक मृत्यू येतो, आजाराने माणूस दगावतो, पण अशा दुर्दैवी पद्धतीने दीपा यांचा झालेला मृत्यू हादरवणारा ठरला आहे. पाणी नसेल तर अन्य कामे करणे अशक्मय म्हणून केवळ टाकीतील पाण्याचा अंदाज घेणे हे त्यांच्या जीवावर बेतले. परंतु आता कुटुंबीयांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पाण्याच्या या समस्येबाबत कोनवाळ गल्ली परिसरातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दीपा यांचे वडील पिराजी पाटील व आई शोभा तसेच सांत्वनास आलेल्या सर्व महिलांनी एलअॅण्डटीच्या नावाने शिमगा केला. बेळगावच्या पाणीपुरवठ्याचे बारा वाजले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
आपणही काळजी घेणे आवश्यक
पाणीटंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. अपार्टमेंटमध्ये कॉमन टाक्मया किंवा स्वतंत्र टाक्मया असतात. त्यासाठी टेरेस सुरक्षित हवा. चुकून जरी पाय घसरला तर मोठी दुर्घटना होणार नाही, यापद्धतीने टेरेसला संरक्षक कवच असणे आवश्यक आहे.
आई माझ्यासमोरच खाली कोसळली – लेखना पावले
आजपर्यंत पाण्याच्या टाकीतील पाणी पाहण्यासाठी पुऊषच वर चढत होते. वडील घरी नसल्याने आणि पाणी संपत आल्याने पाण्याचा अंदाज घेण्यासाठी आई माझ्यासोबत वर आली होती. मी वर चढले पण मला गरगरत आहे, असे म्हणताच तिने मला खाली उतरवून ती स्वत: वर चढली. आजपर्यंत कधीच बिल्डिंगमधील कोणत्याच महिला शिडी चढून पाणी पाहण्यासाठी गेलेल्या नव्हत्या. आईपण कधी गेली नव्हती. पाण्याशिवाय काम खोळंबले म्हणून ती चढली आणि माझ्यासमोरच खाली कोसळली. मी किंचाळत धावत खाली उतरले. आईला माझ्या मांडीवर घेतले. पुढचे मात्र मला काहीही समजत नव्हते. डॉक्टरांनी मात्र आई मृत झाल्याचे सांगितले. लेखना यंदा पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेला बसणार आहे. पण झालेल्या घटनेने ती हादरून गेली आहे. तिची धाकटी बहीण शाळेत शिकते. दोन्ही बहिणी एकमेकींना घट्ट बिलगून हादरलेल्या अवस्थेत बसल्या आहेत.
एलअॅण्डटीचे व्यवस्थापन सुधारणार का?
पाणीपुरवठा मंडळाने एलअॅण्डटी कंपनीकडे पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आणि शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. यापूर्वीसुद्धा शहरात पाणीटंचाई नव्हती असे नाही. एप्रिल-मे मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. मात्र स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले आणि असंख्य ठिकाणी जलवाहिन्यांना जेसीबीचा धक्का लागून पाणी गळती सुरू झाली. कंपनी आपल्यापरीने गळती दूर करण्यास प्रयत्नशील असली तरी हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. दुसरे म्हणजे कंपनीकडून नागरिकांना योग्य ती उत्तरे मिळत नाहीत. आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. तेव्हा महिलांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते. पाणी फक्त एक तास सोडा पण दोन-तीन दिवसांनी तरी द्या. अथवा सकाळी आणि सायंकाळी एक तास द्या. चोवीस तास पाणीपुरवठ्याची आश्वासने बस्स झाली. आता पाण्याची नेमकी वेळ आणि कालावधी सांगा, अशी मागणी होत आहे.
पाण्याच्या सावळ्या गेंधळाने माझ्या लेकीचा बळी घेतला

मुलीला फोन केला असता आठ ते दहा दिवस पाणी नाही, असे ती सांगत असे. आम्ही राहतो त्या वैभवनगर येथे सुद्धा पाणी नाहीच. रात्री साडेतीन वाजता तेथे पाणी सोडले जाते. ते सुद्धा पुरेशा दाबाने येत नाही. रात्री-अपरात्री झोपेचे खोबरे करून पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. गेल्या महिन्यात या परिसरात पुरेसे पाणीच आले नाही. परंतु बिल मात्र भरमसाट आले आहे. या पाण्याच्या सावळ्या गेंधळाने माझ्या लेकीचा बळी घेतला.
-पिराजी पाटील
एलअॅण्डटी पाण्याच्या व्यवस्थापनात अपयशी

एलअॅण्डटी कंपनीला पाण्याचे व्यवस्थापन जमत नाही. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. विहिरीचेही पाणी मिळत नाही. ही दुर्घटना घडल्यानंतर आज पाणी आले आहे. पूर्वी गेस्टहाऊसमधून पाणी सोडत असतं. आता तेसुद्धा बंद झाले आहे.
– गीता कदम
घटनेमुळे आम्हाला धक्काच बसला

आम्ही आपापली कामे करत असताना जोरदार किंकाळ्यांचा आवाज आला. तर दीपा मुलीच्या मांडीवरच कोसळल्या होत्या. हे पाहून आम्हाला धक्काच बसला. हे सर्व पाणी नसल्यामुळे झाले आहे. पाण्यामुळेच परिसरात वादही होत आहेत.
– मंगल देसाई
मोटर लावून पाणी खेचण्याचे प्रकार चुकीचे

पाण्याने आमच्या गल्लीतील दीपा यांचा बळी घेतला. नळावरची भांडणे नेहमीचीच आहेत. काही जणांनी मोटर लावून पाणी खेचले आहे. ती समस्यासुद्धा आहे. परंतु दीपा यांचा मृत्यू असा व्हायला नको होता.
– शोभा नागरे
वारंवार कळवूनसुद्धा दखल नाही

कितीवेळ पाण्यासाठी वाट पाहायची. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे घरी कोणा पाहुण्यांना या म्हणून सांगणे कठीण होऊन बसले आहे. वारंवार कळवूनसुद्धा कोणीही दखल घेत नाही. टँकरही येत नाही. ही वर्षानुवर्षाची समस्या आहे. आतातरी ती सुटेल का? हा प्रश्न आहे.
– प्रियांका गुंडकल
चोवीस तास पाणी येणार कधी?

पाणीटंचाईसंदर्भात आम्ही महिलांनी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी टिळकवाडी विभागातील कार्यालयात जाण्यास सांगितले. तेथे जाऊन निवेदन दिले. या परिसरात चोवीस तास पाणी येणार असे सांगण्यात येते. पण ते कधी? याचे उद्रार दिले जात नाही. अधिकाऱ्यांना भेटू दिले जात नाही. मग पाणी समस्या सुटणार कशी?
– शोभा देसाई









