हिंडलगा पंपिंगमध्ये दुरुस्ती
बेळगाव : हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कारणास्तव ठप्प झालेला पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत होणार आहे. मंगळवारपेठ आणि इतर ठिकाणी पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एलअॅण्डटी कंपनीकडे पाण्याची जबाबदारी दिल्यापासून पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत. शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणीपुरवठा ठप्प होत आहे. तर काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील दोन दिवसांपासून हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी हे काम अंतिम टप्प्यात आले असून शुक्रवारपासून ठप्प झालेल्या भागात पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती एलअॅण्डटीने दिली आहे.









