जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण : उन्हाळ्यामध्ये मागणीत वाढ
बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीकडून कणबर्गी-सदाशिवनगर परिसरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती एलअॅण्डटीने दिली आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव दि. 16 व 17 रोजी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. आता जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी सायंकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. कणबर्गी आणि सदाशिवनगर येथील जलवाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे एलअॅण्डटीकडून तातडीने याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दोन दिवस जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
त्यामुळे गुरुवारी सायंकाळीच शहरातील काही भागात पाण्याचा पुरवठा करण्यात आला. तर शुक्रवारपासून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. मात्र मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी नागरिक स्वत: टँकरने पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे आर्थिक फटका बसू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे शहरात पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे हिडकल जलाशयावर अतिरिक्त पाण्याचा भार पडला आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा होतो. मात्र हिडकल जलाशयावर बेळगावबरोबरच संकेश्वर आणि हुक्केरी शहराचा अतिरिक्त भार आहे. त्यातच राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे हिडकलमधून अतिरिक्त पाण्याचा उपसा होऊ लागला आहे.









