जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदलेली चर न बुजविल्याने समस्या
बेळगाव : पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने पिरनवाडी येथील दुरुस्तींसाठी खोदलेली चर राष्ट्रीय पक्षाच्या प्रचार फेरीसाठी बुजविल्याने पिरनवाडीतील संपूर्ण गावचा पाणीपुरवठा गेले चार दिवस बंद असल्याने नागरिकांची पाण्यासाठी उन्हात भटकंती सुरू आहे. शुक्रवार दि. 5 रोजी पिरनवाडी येथील सिद्धेsश्वर गल्लीतील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पट्टण पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी व महादेव बाळाराम शहापूरकर यांनी प्रयत्न करून तातडीने दुरूस्ती काम हाती घेवून चर काढली होती. परंतु शनिवारी एका सत्ताधारी राष्ट्रीय पक्षाची सायंकाळी प्रचारफेरी त्या मार्गावरून जाणार असल्याने फुटलेली पाईपलाईन दुरूस्त न करताच ती बुजविण्यात आली. या प्रकारामुळे पिरनवाडी गावच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी पंचायतीतर्फे पुन्हा फुटलेल्या पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतू गेले चार-पाच दिवस पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रविवारी असूनही पंचायतीचे कर्मचारी महादेव बाळाराम शहापूरकर व प्रशांत लकूगोळ व इतर दुरुस्तीसाठी झटत होते. परंतु अद्यापही पाणी ाgरवठा सुरू नव्हता. घडल्या प्रकारामुळे पिरनवाडी परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रचार सुरू होण्यापूर्वी अनेकांचे पाण्याचे टँकर गल्लोगल्ली फिरत होते. मात्र सध्या एकही टँकर फिरकला नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत.









