नंदगडवासियांची पाण्यासाठी पायपीट : ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष
खानापूर : नंदगड येथील नळपाणीपुरवठा योजना गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाली असून नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. खासगी पाणीपुरवठा करणाऱ्यांकडून नागरिक आपली सोय करून घेत आहेत. पाण्याविना नागरिकांचे हाल होत असून याकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नंदगडवासियांकडून ग्राम पंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नंदगड गावची लोकसंख्या 9 हजारच्या आसपास असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीजवळील कूपनलिकेतून पाणी कुणकीकोप्प येथून आणले जाते. तेथून लिफ्ट यंत्रणेद्वारे नंदगडवासियांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच नंदगडच्या दक्षिण भागात नंदगड, हलशी रस्त्याजवळील कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र बिडीजवळील कूपनलिकेच्या मोटारी नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून नंदगड गावचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. याकडे ग्राम पंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कडक उन्हाळ्यात गावचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. याचा फायदा खासगी पाणीपुरवठादारानी उचलला असून गावात खासगी पाणी पुरवठादारांकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नागरिक नाईलाजास्तव खासगी पाणीपुरवठादारांकडून पाणी घेत आहेत. याबाबत ग्रा. पं. कडे नळपाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करुनदेखील ग्रा. पं. ने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नंदगड येथील 15 जलशुद्धीकरण केंद्रे पूर्णपणे बंद
नंदगड गावात ग्राम पंचायतीकडून ठिकठिकाणी पंधरा जलशुद्धीकरण केंद्रे बसविण्यात आली आहेत. ही संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्रे गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. ही जलशुद्धीकरण केंद्रे दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ग्राम पंचायतीकडून कोणताही क्रम घेण्यात आला नाही. त्यामुळे सरकारचा कोट्यावधीचा निधी वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणीपुरवठा केल्यास नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मात्र ग्रा. पं. ने याकडे दुर्लक्ष केले आहे.
पीडीओचा बेजबाबदारपणाच कारणीभूत
नंदगड ग्राम पंचायतीचे पीडीओ हे अतिशय बेजबाबदारपणे वागत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत कायमच कानाडोळा करत आहेत. नागरिकांच्या समस्याबाबत पीडीओ अजिबात गांभीर्याने घेत नाही. तसेच तक्रारी घेऊन गेल्यास त्याही ऐकूणही घेत नाहीत. त्यामुळे पीडीओच्या या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणीपुरवठ्याबाबत पीडीओशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले आहे. नंदगड ग्रा. पं. चे अध्यक्ष यल्हारी गुरव यांना पाणीपुरवठ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, बिडी येथील कूपनलिकातील मोटार खराब झाल्याने काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दोन दिवसापूर्वीच मोटारी दुरस्त केल्या असून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदगड गावासाठी नंदगड डॅममधून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचा आराखडा तयार झाला असून याबाबत ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे.









