उष्णतेमुळे कूपनलिका-विहिरींनी तळ गाठला : पाण्यासाठी भटकंती सुरूच
वार्ताहर /अगसगे
अगसगे गावात गेल्या एक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई होत आहे. गावात 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे सार्वजनिक विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर कुणी पाणी देता का? पाणी असे म्हणण्याची वेळ आली आहे. गावातील दोन सार्वजनिक विहिरी आणि कूपनलिकामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र वळीव आणि मान्सूनदेखील लांबणीवर पडल्याने या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. परिणामी गावात 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाटील गल्लीत तब्बल 15 दिवसांतून एकदा पाणी सोडत आहेत. यामुळे ग्रामस्थांना सकाळपासूनच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. काहीजण शेतवडीतून पाणी आणत आहेत. बैलगाडी, हातगाडीच्या माध्यमातून कष्ट करून पाणी आणून जपून वापरण्याची वेळ आली आहे. याबाबत ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. इतकी गंभीर परिस्थिती असली तरी ग्रामपंचायत मात्र पाण्यासाठी कोणतीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे.
पाण्याची मोटार खराब
सध्या गावच्या तलावामध्ये काही प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र पाणी उपसणारी मोटार नादुरुस्त झाली आहे व तलावामधून गावात जाणारी पाईपलाईन जागोजागी नादुरुस्त झाली आहे. 2-3 महिने झाले तरी दुरुस्तीचे काम करण्याकडे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि पीडीओ यांनी कानाडोळा केला आहे. यामुळे आज ग्रामस्थांना तलावाच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे ग्रा. पं. अध्यक्षा व पीडीओ यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाण्यासाठी लाखो रुपये खर्च
केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून गावांना मुबलक शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने जलजीवन मिशन योजना राबवून लाखो रुपये खर्च करून पाणी साठाच्या ठिकाणाहून गावामध्ये पाईपलाईन घालून घरोघरी नळ कनेक्शन जोडले आहे. मात्र त्या ठिकाणाहूनदेखील पाणीसाठा कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे थोड्या प्रमाणात पाणी 8-10 दिवसांतून एकदा एका गल्लीला सोडण्यात येत आहे.
टँकरणे पाणीपुरवठा : ग्रा. पं. सदस्य गुंडू कुरेन्नवर
सध्या मान्सूनदेखील लांबला आहे. यामुळे गावातील तलाव, विहिरी, कूपनलिकेची पाणीपातळी खालावली आहे. कूपनलिकेतून थोड्या प्रमाणात पाणी येत आहे. विहिरांनी तळ गाठला आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा क्रमानुसार आम्ही थोड्या-थोड्या प्रमाणात गावातील गल्लीमध्ये पाणी सोडत आहोत. यापुढे आम्ही बैठक घेऊन तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीला पाणी समस्यांचे निवेदन देऊन त्याच्यावर विश्वास न ठेवता गावामध्ये टँकरणे पाणीपुरवठा करतो.









