कोल्हापूर :
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरात मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी शहरातील 17 बडे थकबाकीदार असणारे पाणीकनेक्शन तोडण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी तब्बल 28 लाख 90 हजार रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारे वसुलीची मोहिम सुरु राहणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागांच्या वसुलीचा आढावा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आठ दिवसांपूर्वी घेतला होता. यामुळे महापालिकेचे विविध विभाग अॅक्टीव्ह झाले होते. यानंतर अनधिकृत नळ कनेक्शन देणाऱ्या नोंदणीकृत प्लंबर यांचा परवाना रद्द करण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या होत्या. यानुसार सोमवार पासून ही मोहिम हाती घेण्यात आली. सोमवारी एस.टी.स्टॅण्ड परिसर, ताराबाई पार्क, नागाळपार्क येथील हॉटेल्स, लॉजिंग्ज व आपार्टमेंट्स इत्यादी ठिकाणी मिटर रिडींग तपासणी व थकबाकी वसुलीची कारवाई करण्यात आली.
या कारवाई करुन 6 लाख 61 हजार रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली. मंगळवारीही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कारवाई सुरु ठेवण्यात आली. मंगळवारी संपूर्ण शहरात 5 पथकांकडून ही कारवाई करण्यात आली. कारवाईची व्याप्ती वाढवत शहरातील 17 बड्या थकबाकीदारांची पाणी कनेक्शन तोडण्यात आली. घरगुती पाणी वापरणारे व ज्यांची थकबाकी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
अशी कनेक्शन खंडीत करण्यात आली. रेल्वेची 24 लाख 64 हजार रुपयांची थकबाकीही वसुल करण्यात आली. याचसोबत अन्य घरगुती व बड्या थकबाकीदारांची मिळून 28 लाख 90 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
शहरात 5 वसुली पथकांची नेमणूक
पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. यापुढेही अनधिकृत नळ कनेक्शन तपासणी, वसुलीची मोहीम सुरु राहणार आहे. तरी, शहरातील सर्व नागरिकांनी आपली अनधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन नियमित करावी. तसेच आपल्या पाणी बिलाची थकबाकी वेळेवर भरुन कटू प्रसंग टाळावे असे आवाहन जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी केले.








