पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती : सुरळीत पुरवठा करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मात्र कॅन्टोन्मेंट परिसरात अद्यापही पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. तब्बल 12 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने कॅन्टोन्मेंटवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. कॅन्टोन्मेंट परिसराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डने पाण्याचे बील थकविले असल्याने निम्मा पाणीपुरवठा कपात करण्यात आला होता. पण पाणीसाठा कमी झाल्याने आता पुन्हा एलऍण्डटी कंपनीने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पाणीपुरवठय़ात कपात केली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना मुबलक पाणी मिळत नाही. गेल्या 12 दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर 12 दिवस झाले तरी पाणीपुरवठा केला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ परिसरातील रहिवाशांवर आली आहे.
बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ
परिसरात असलेल्या कूपनलिका आणि विहिरीच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी केला जात आहे, पण पिण्याचे पाणी कुठून आणायचे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पिण्यासाठी टँकरने आणि बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. उन्हाळय़ात पाणी टंचाईमुळे पाणी समस्येला सामोरे जावे लागले. पण सध्या पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तरीदेखील कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे आता पाणीपुरवठा कधी होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
अधिकाऱयांकडून उडवाउडवीची उत्तरे
पाणीसमस्येबाबत तक्रार केली असता पाणी बिलाचे कारण सांगून उडवाउडवीची उत्तरे कॅन्टोन्मेंटचे अधिकारी देत आहेत. तर कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली असता त्यांच्या कक्षाचा दरवाजा नागरिकांसाठी नेहमीच बंद असतो. त्यामुळे निर्माण होणाऱया समस्यांबाबत कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांनी तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.









