गौंडवाड येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत : मिनी जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
पुनर्वसू नक्षत्राच्या दमदार पावसाने तालुक्यातील संपूर्ण शिवारे जलमय केली. नदी, नाले, तलाव तुडूंब भरले. परंतु गौंडवाड येथील भरम तलाव, लक्ष्मी तलाव, पाण्याने भरलेच नाहीत. तर शिवारामध्येसुद्धा पाणी झाले नाही. विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा अजून वाढलेली नाही. यामुळे गौंडवाड येथील शेतकरीवर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तलाव भरणीसाठी मार्कंडेय नदीकाठावरील मिनी जलसिंचन योजना त्वरित सुरू करून गौंडवाड शिवार जलमय करण्याची मागणी होत आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. तालुक्यातील नाले, तलाव भरुन वाहत आहेत. मार्कंडेय नदीला पूर आला. परंतु अजूनही गौंडवाड येथील भरम तलाव व लक्ष्मी तलाव भरलेले नाहीत. हे तलाव भरले तरच गौंडवाड गावचे संपूर्ण शिवार ओलिताखाली येऊन जलमय होणार आहे. शिवारातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.
गौंडवाड, कंग्राळी बुद्रुक गावच्या पश्चिमेकडून वाहणारी या भागाची जीवनदायीनी मार्कंडेय नदीला जेव्हा भरपूर पाणी येते. तेव्हा नदी दुथडी भरुन वाहू लागते. परंतु शिवार जलमय झाले नसेल तसेच गौडवाड गावातील भरम तलाव व लक्ष्मी तलाव या जलसिंचन योजनेने तुडूंब भरल्यावर सर्व गौंडवाड शिवार जलमय होते. शिवाराबरोबर गावातील विहिरींची पाणी पातळीसुद्धा वाढते. हा उद्देश समोर ठेवून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या फंडातून गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी सदर मिनी जलसिंचन योजना मार्कंडेय नदीकाठावर बसविण्यात आली. मार्कंडेय नदीपासून कंग्राळी बुद्रुक शिवारातून गौंडवाड शिवारातून लक्ष्मी तलाव, भरम तलाव बाजूने काकती तलावाला मिळविण्यात आला. तलाव भरण्यासाठी दोन्ही ठिकाणी व्हॉल्व्ह ठेवण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी सदर योजना सुरू करून गौंडवाड येथील दोन्ही तलाव मार्कंडेय नदीच्या पाण्याने तुडूंब भरण्यात आले. यामुळे गौंडवाड येथील संपूर्ण शिवार जलमय झाले होते. विहिरींना मुबलक पाणीसाठा झाला होता. परंतु गेली चार वर्षे सदर योजना बंद असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तेव्हा या भागाच्या लोकप्रतिनिधींनी तसेच पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन मार्कंडेय नदीकाठावरील सदर योजना त्वरित सुरू करून शेतकरी वर्गाबरोबर इतर नागरिकांनाही दिलासा देण्याची मागणी होत आहे.









