8 ते 13 दिवसाआड एकदा पाणीपुरवठा : समस्या सोडविण्याकडे साफ दुर्लक्ष, सभासदांचाही कानाडोळा
प्रतिनिधी/ बेळगाव
एपीएमसी परिसरात पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. ऐन पावसाळ्यातही मागील 8 ते 12 दिवसांपासून एपीएमसी परिसरात पाणी पुरवठा झाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
वारंवार पाण्यासाठी येथील व्यापाऱ्यांना भटकंती करावी लागते. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असताना एपीएमसी प्रशासन याकडे का लक्ष देत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एपीएमसी परिससरात सध्या पाण्यासाठी त्रास घेण्याची वेळ व्यापारी आणि नागरिकांवर आली आहे. येथे हमालीसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने बाहेरील हॉटेल किंवा इतर दुकानांवर अवलंबून रहावे लागत आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची वेळ निर्माण झाली आहे.
व्यापारी-हमालांची गैरसोय
विकासाचे गाजर दाखवून सोयी सुविधा पुरविण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने येथील व्यापारी, हमाल आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. जनावरांचा बाजार भरतो त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये पाणीच सोडत नसल्याने पिण्याच्या पाण्यापासून जनावरांची स्थिती गंभीर बनली होती. याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. वारंवार पाणी समस्या निर्माण होत असल्याने ती सोडविण्यासाठी मात्र कोणतेच अधिकारी अथवा सदस्य पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.
समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्याची मागणी
ऐन पावसाळ्यात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने एपीएमसी प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. लाखेंचा कर जमा होत असला तरी येथे सुविधा पुरविल्या जात नाहीत. मागील वेळीही अशाच प्रकारे संबंधित सदस्यांनी आणि अध्यक्षानी विकासाचे गाजर दाखवून नागरिकांची दिशाभूल केली होती. पाण्यासाठी भटकंती होत असताना ही समस्या कायमस्वऊपी निकालात काढण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता तरी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठोस पावले उचलण्याची गरज
स्थानिक स्वराज्य संस्थेत मोडणाऱ्या आणि जिल्ह्यातील महत्त्वाची आणि कोट्यावधीची उलाढाल होणारी मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अंतर्गत सोयी, सुविधा देण्याची काळजी कोण घेणार? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार 80 ते 21 एकरमध्ये विस्तारला गेला आहे. मोठ्या प्रमाणात देवघेव चालणाऱ्या या बाजारपेठेत सोयी सुविधांचा वानवा आहे. या ठिकाणी टाक्मयांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या टाकीमध्ये पाणीच नसल्याने ‘टाकी असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. यासाठी एपीएमसी पाणी समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.









