अनेक वर्षांपासूनची परिस्थिती, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे समस्या, तातडीने सोय करण्याची मागणी
बेळगाव : दुष्काळी परिस्थिती आणि नागरिकांचे होणारे हाल पाहता भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. अशीच अवस्था तालुका पंचायतची झाली असून पंचायतीचे काम आणि बारा महिने थांब, अशी गत झाली आहे. तालुका पंचायतीच्या अंतर्गत कामाला चालना देण्यात आली आहे. सुमारे 30 लाखांहून अधिक निधी खर्च करण्यात येत असला तरी येथील समस्या कायमच राहणार आहेत. मागील दोन वर्षांपासून बेळगाव तालुका पंचायतमध्ये पिण्याचे पाणी ठेवण्यात आले नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुका पंचायतमध्ये 30 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला तरी कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बेळगाव तालुका पंचायतमध्ये दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे येथे दररोज नागरिकांची मोठी वर्दळ असते. दरम्यान स्वसहाय्य संघ व इतर संघ, संस्थांमधील कार्यकर्त्यांना व इतरांना प्रशिक्षणही देण्यात येते. मात्र या ठिकाणी पाणी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तालुका पंचायतमध्ये स्वसहाय्य संघ, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य यासह इतर संघ संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण देण्यात येत असले तरी कार्यालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने एखाद्या हॉटेल किंवा इतर ठिकाणी जाऊन पाणी प्यावे लागत आहे.
मुख्यत: तालुक्याचे मुख्य कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यालयातच पिण्याचे पाणी नसल्याने तालुक्याची काय अवस्था असणार? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही पाण्याविना बसावे लागते. परिणामी याचा फटका त्यांना सहन करावा लागत असला तरी नोकरी असल्याने ते बोलण्यास धजत नाहीत. तालुका पंचायतमध्ये मध्यंतरी सभागृह अस्तित्वात असताना पाणी ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाण्याची सोय केली होती. मात्र आता पुन्हा पिण्याचे पाणी ठेवण्याकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. पाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत असून अधिकाऱ्यांनाही घरातून अथवा बाहेर जाऊनच पाणी प्यावे लागत आहे. तालुका पंचायतमध्येच पाणी नसल्याने तालुक्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. बेळगाव तालुका सध्या दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कार्यालयात पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. कार्यालयाचा विकास करण्याच्या नावाखाली पैसे खर्च करण्यात येत असले तरी नागरिकांची सोय करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नेमका विकास कोणाचा होत आहे? सध्या येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मध्यंतरी एक बैठकी दरम्यान या ठिकाणी पाणी नसल्याने मोठा गोंधळ माजला होता. आताही तशीच अवस्था निर्माण झाली आहे. तेंव्हा पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने करावी, अशी मागणी होत आहे.









