यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त दोन धरणांवर रोषणाई होणार असल्याची माहिती
सांगे : राज्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी रविवारी सांगेतील साळावली धरणाला भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास आणि आस्वाद घेण्यास कोणीही मागे राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही 15 ऑगस्टला साळावली आणि अंजुणे धरणांवर रोषणाई केली जाणार असून तमाम जनतेने त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंत्री शिरोडकर यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलताना केले. धरणाचा जलाशय तुडुंब भरून वाहत आहे. नेहमीच्या पातळीपेक्षा एक मीटर जास्त भरून जलाशय वाहत आहे. ही पातळी नोव्हेंबरपर्यंत राहील, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. 15 ऑगस्टच्या रोषणाईच्या तयारीनिमित्त आपण आलो होतो. त्याचबरोबर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यावा हाही हेतू होता, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख स्थानिक आणि देशी-विदेशी पर्यटकांनी साळावली धरण परिसराला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला, अशी माहिती शिरोडकर यांनी दिली.
आणखी तीन धरणे उभारणार
राज्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी आणखी तीन धरणे बांधण्यात येणार असून आवश्यक ‘ना हरकत दाखले’ मिळाले की, सहा ते आठ महिन्यांत त्यांचे काम चालू होऊ शकते, असे मंत्री शिरोडकर यांनी स्पष्ट केले. सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी देखील मंत्री शिरोडकर यांची विश्रामधामात भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीवेळी मंत्र्यांसमवेत जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, अतिरिक्त मुख्य अभियंता अंकुश गावकर, कार्यकारी अभियंता जेसन मिनेझिस, साहाय्यक अभियंता सिडनी फर्नांडिस इत्यादी हजर होते. म्हादई खोऱ्यात सत्तरी भागात पाच ते सहा धरणे बांधण्याचा विचार असून आवश्यक ते दाखले मिळविणे आदी सोपस्कार चालू आहेत, अशी माहिती बदामी यांनी दिली. दरम्यान, मंत्री शिरोडकर यांची ही खासगी भेट असल्याची माहिती पाजीमळ येथील जलस्रोत खात्याच्या कार्यालयाकडून मिळाली.









