जिह्यातील धरणांमध्ये सरासरी 78 टक्के पाणीसाठा शिल्लक
हिवाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यांत पाण्याचा कमी वापर
तीव्र उन्हाळ्याच्या कालावधीसाठी मुबलक पाणीसाठा
पाणी टंचाईची जाणवणार नाही झळ
कोल्हापूर: कृष्णात चौगले
मान्सूनच्या कालावधीतील अतिवृष्टी, त्यानंतरचा जोरदार परतीचा पाऊस आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत कोसळणारा अवकाळी यामुळे जिह्यातील सर्व धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला. नोव्हेंबरच्या मध्यावधीपासून पिकांना पाण्याची गरज भासू लागली असली तरी जानेवारी अखेरपर्यंत तीव्र थंडी जाणवली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात पाण्याचा वापर कमी प्रमाणात झाला. 09 फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व धरणांमध्ये सरासरी 78 टक्के पाणीसाठा शिल्लक असून केवळ 22 टक्के वापर झाला आहे. धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी अद्याप चार महिने तीव्र उन्हाळ्याचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे शिल्लक पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
जिह्यात राधानगरी, दूधगंगा, वारणा व तुळशी हे मोठे प्रकल्प आहेत. तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे हे मध्यम प्रकल्प आहेत. राधानगरी आणि दुधगंगा या दोन धरणांतून पंचगंगा खोऱ्यातील गावांना पाणी पुरवठा होतो. तर मध्यम प्रकल्पांतून जिह्यातील इतर क्षेत्र ओलीताखाली येते. सध्या या सर्व धरणांत सरासरी 78 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र गतवर्षी याच कालावधीत असणाऱ्या पाणी साठ्यापेक्षा सुमारे 10 टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. काही लघुपाटबंधारे प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर सर्व लघुपाटबंधारे प्रकल्पामध्येही पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून यंदा पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही संभाव्य पाणी टंचाईची जाणिव ठेवून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिह्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरच्या गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत पिकांना पाण्याची जास्त गरज भासू लागली आहे. परिणामी जिह्यातील सर्वच धरणांतील पाणी उपशाचे प्रमाण वात चालले आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये गतवर्षापेक्षा सात टक्के पाणीसाठा जास्त आहे. मार्च महिन्यापासून उन्हाची झळ अधिकच जाणवणार आहे. हे पाणी पुरेसे असल्यामुळे यंदा पाटबंधारे विभागाने चारही मोठ्या धरणक्षेत्रामध्ये उपसाबंदी जाहीर केलेली नाही. दरम्यान डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा कालावधी असल्यामुळे पाण्याचा जास्त वापर झाला नाही. पण मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कडक उन्हाच्या कालावधीमध्ये पाण्याचा वापर साधारणपणे दुप्पटीने वाढणार आहे.
उपलब्ध पाणीसाठा 30 जूनपर्यंत पुरविण्याचे नियोजन
दूधगंगा खोऱ्यामध्ये 39 हजार हेक्टर शेतजमिनीला पाणीपुरवठा होतो. तर राधानगरी खोऱ्यामधील 45 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सोय उपलब्ध होते. यामध्ये खरिप, रब्बी, उन्हाळी आणि ऊस पिकांचा समावेश आहे. खरिप हंगाम वगळता फेब्रुवारी महिनाअखेरपासून रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु होईल. त्यानंतर उन्हाळी आणि ऊस पिकांसाठी पाण्याचा वापर वाढणार आहे. हा उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी 15 जुलैपर्यंत आणि शेतीसाठी 30 जूनपर्यंत पुरवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे नियोजन सुरु आहे.
पाणीसाठा मुबलक, तरीही काटकसरीची गरज
यंदा कोल्हापूरमध्ये चांगले पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. तरीही संभाव्य पाणीटंचाईची जाणिव ठेवून उपलब्ध पाणीसाठा 30 जून पर्यंत पुरवून त्यातील सुमारे 25 टक्के पाणीसाठा पुढील वर्षासाठी शिल्लक ठेवण्याची गरज आहे. त्याच धर्तीवर पाटबंधारे विभागाकडून यंदा नियोजन सुरु आहे. सिंचनाखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनसारख्या माध्यमांचा वापर करण्याची गरज आहे. तसेच पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील पाण्याचा वापरही जपून करणे आवश्यक आहे.
स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर
धरणांतील पाणीसाठा (9 फेब्रुवारीअखेर)
धरणाचे नाव पाणीसाठा (टक्केवारी)
राधानगरी 77.42
तुळशी 82.51
वारणा 71.74
दूधगंगा 61.61
कासारी 77.57
कडवी 82.58
कुंभी 81.48
पाटगांव 77.67








