नागरिकांना शुद्ध पाणी मिळविण्यासाठी कंग्राळी खुर्द-हिंडाल्को कंपनी येथे भटकंती करण्याची वेळ
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
नागरिकांना रोज पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून शासनाने गावोगावी शुद्ध पाण्याची यंत्रे बसविली आहेत. परंतु कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं.च्या बाजूलाच असलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. याची ग्रा. पं. अधिकाऱ्यांबरोबर सदस्यांनासुद्धा दुरुस्ती करण्यासाठी वेळ नसल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळविण्यासाठी कंग्राळी खुर्द किंवा हिंडाल्को कंपनी येथे भटकंती करावी लागत आहे. तेव्हा ग्रा. पं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इकडे त्वरित लक्ष देऊन यंत्राची दुरुस्ती करून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यालयाला लागूनच शासनाने जलशुद्धीकरण यंत्र बसविले आहे. परंतु हे यंत्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळविण्यासाठी शाहूनगर, कंग्राळी खुर्द किंवा हिंडाल्को कंपनी येथील जलशुद्धीकरण यंत्रामधून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. परंतु ग्रा. पं. अधिकाऱ्यांना व सदस्यांना यंत्राची दुरुस्ती करण्यासाठी वेळ नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
कूपनलिका,खासगी विहिरींचे पाणी पिण्याची वेळ
कोणताही आजार अशुद्ध पाण्यापासून तयार होतो. म्हणूनच नागरिकांनी दररोज शुद्ध पाणी पिऊन तंदुरुस्त राहण्याच्या उद्देशाने शासनाने गावोगावी जलशुद्धीकरण यंत्रे बसविली आहेत. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी किंवा सदस्यांनी यंत्र बिघडल्यास त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याने नागरिकांच्यावर असे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून ऐकावयास मिळत आहेत.
जुन्या ग्रा. पं.जवळ नवीन यंत्र बसविण्याची मागणी
कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 25 हजारहून अधिक असल्याने ग्रा. पं. कार्यालयाच्या बाजूला बसविलेल्या जलशुद्धीकरण यंत्रातील पाणी नागरिकांना पुरत नाही. त्यातच सदर यंत्र वरचेवर बिघडत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे जुनी ग्रा. पं. येथे जर आणखी एक जलशुद्धीकरण यंत्र बसविल्यास नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चांगली सोय होईल. तसेच जर एक यंत्र बिघडल्यास दुसरे यंत्र सुरू रहात असल्यामुळे नागरिकांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही, अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.









