पर्ये, मोर्ले, होंडा, पिसुर्ले पंचायतक्षेत्रासाठी पाणीपुरवठा : अंदाजित खर्च 24 कोटी रु.: आमदार डॉ. देविया राणे यांची माहिती
वाळपई : सत्तरी तालुक्मयातील पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने निर्माण होत आहे. दाबोस पाणी प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. यामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. याची विशेष दखल घेऊन पर्ये मतदारसंघातील पर्ये, मोर्ले, होंडा व पिसुर्ले या चार पंचायतीसाठी पर्ये येथे 15 एमएलडी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प जलसिंचन खाते व पाणीपुरवठा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली असून सुमारे 24 कोटी खर्च होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली. पर्ये, मोर्ले, होंडा व पिसुर्ले या चार पंचायती पर्ये मतदारसंघात आहेत. याभागात सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. आतापर्यंत पर्ये व मोर्ले या पंचायतींना साखळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तर होंडा व पिसुर्ले पंचायतीला दाबोस पाणी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तरीही नेहमीच पाणी टंचाईची समस्या असतेच. यामुळे पर्ये येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी वाळवंटी नदीच्या पाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ देविया राणे यांनी दिली.
वाळवंटी नदीचे पाणी वापरणार
वाळवंटी नदीच्या पाण्यावर प्रकल्प चालणार आहे. जलसिंचन खाते वाळवंटी नदीवर पंपिंग स्टेशन कार्यान्वित करणार आहे. यासाठी 19 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. सदर पाणी पंपिंग स्टेशनद्वारे खेचून शुद्धीकरण प्रकल्पाला उपलब्ध करून देणार आहे. पाणीपुरवठा खाते चारही पंचायतींना शुद्ध पाणी वितरित करणार आहे, अशी माहिती जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. पर्ये पंचायतीच्या अनेक प्रभागांमध्ये आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या एक वर्षापासून आमदार डॉ. देविया राणे विशेष प्रयत्न करीत आहेत. जलसिंचन खात्यातर्फे पंपिंग स्टेशन उभारून पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे व पाणीपुरवठा कार्यालयातर्फे शुद्ध पाणी वितरित करणे हा दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या संदर्भात जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या समवेत जागेची पाहणी करून प्रकल्प उभारण्याचा चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
केरी पंचायत क्षेत्रात स्वतंत्र प्रकल्प
केरी पंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून संबंधित पंचायत क्षेत्रातील भागामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत असतो. जॅकवेल अभावी या भागामध्ये गढुळ पाणीपुरवठा होतो. अनेकवेळा या पाण्यामध्ये लोहतत्व प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. यामुळे अनेकवेळा या भागांमध्ये गढूळ पाणी पुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.









