कोल्हापूर / संतोष पाटील :
दरवर्षी भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच शहरासह सुमारे 300 हून अधिक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहरात तर दर आठ दिवसांनी पाणी पुरवठा खंडीत होतो. जलस्त्राsतांचा अपुरा वापर व पावसाळी पाणी नियोजनाच्या अपयशामुळेच जलसमृध्द जिह्याला दुष्काळ सदृश्य झळा सहन कराव्या लागत आहेत.
हातकणंगलेपासून गगनबावडा तालुक्यापर्यंत 900 ते 5 हजार मिलीमिटर पावसाची नोंद झाली. जिह्यातील 1029 गावे, वाड्यावस्त्या असा एकही भाग नाही, जिथे पावसाची कृपा झाली नाही. असे असूनही हातकणंगले या कमी अवर्षण तालुक्यात व गगनबावडा या सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या भागातही यंदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात 71 हजार हेक्टर जमीन ऊस पिकाखाली आहे. कमी पाऊसाचे प्रमाण असूनही शिरोळ तालुक्यात 20 हजार 800 हेक्टर तर कागल तालुक्यात 18 हजार 684 हेक्टरवर ऊस घेतला जातो. करवीर तालुक्यात 18 हजार 710 हेक्टरवर ऊस पीक आहे. शिरोळ व कागल हे कमी पर्जन्यमानाचे प्रदेश असूनही ऊस उत्पन्न अमर्याद पाणी उपशाला निमंत्रण देत आहे. जिह्यात दोन टक्केही ठिबक सिंचनाने शेतीला पाणी दिले जात नाही. अनियमित व वाजवीपेक्षा पाण्याचा उपसा करुन शेतीला अतिरिक्त पाणी देणे पाणी टंचाईचे प्रमुख कारण आहे.
कोल्हापूरच्या वातावरणात पाच वर्षात सरासरी दोन अंशाची वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. परिणामी जलबाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्याचा फटका जिह्यातील 22 लहान, मोठ्या धरणातील पाणी साठा, 450 गाव तलाव, 100 पाझर तलावातील पाण्यावर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने पंचगंगा नदीसह जिह्यातील 14 नद्या प्रदुषणग्रस्त आहेत. नद्या प्रवाहीत ठेवणे हाच एकमेव यावरील उपाय आहे. नद्यावरील दीडशेहून अधिक बंधाऱ्यामुळे गाळाचे प्रमाण वाढले आहे. जलप्रदुषण मुक्ती कागदावरच राहिल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त पाणी धरणातून सोडावे लागते. परिणामी जल नियोजन कोलमडत आहे. सक्षम यंत्रणेच्या जोडीला नागरिकांच्या पाणी वापराबाबत सजगता आवश्यक आहे.
दहा वर्षात ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च झाले. मात्र, पाणी उपसा, वापरांवर कोणतेही बंधन नसल्याने पाणी टंचाईच्या झळा कायम राहिल्या. कोल्हापूर महापालिका वगळता अनेक भागात नळ पाणी योजनेतील नळांना तोट्या नाहीत. नैसर्गिक स्त्राsत व पाणी साठ्यातून अमर्याद पाणी उपसा केला जातो. बेसुमार पाणी उपसा पुन्हा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. 200 हून अधिक वाड्या झऱ्यातून होणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. नैसर्गिक पाणी स्त्राsतांचे बळकटी करुन पाणी साठे, नदी व तलाव प्रदुषण मुक्त ठेवणे ही काळाची गरज आहे.महिन्यातून किमान दोनवेळा मुख्य पाईपलाईनची दुरुस्तीमुळे निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट ठरलेला असतो. पाणीगळती व चोरीचा नेमका आकडा माहिती नसलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनेक वर्षांच्या नियोजनशुन्य कारभाराचा फटका शहरवासियांना बसत आहे. 550 किलोमीटर पाईपलाईनचा नेमका आराखडाच नसणे व किमान 300 व्हॉल्व्ह रस्त्याखाली गायब आहेत. थेट पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह गळतीसह अंतर्गत पाईपलाईनची गळती काढण्याचे काम हा नित्याचा विषय बनला आहे.
22 मोठी व मध्यम धरणे
450 गाव तलाव
100 पाझर तलाव
2444 नळ पाणी पुरवठा योजना
71 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना
अंदाजे 60 हजार बोअरवेल
327 पाण्याचे झरे
4167 हातपंप
1853 शेत विहीरी
991 सार्वजानिक विहिरी
939 बोअरवेल योजना
- जलदिनाचे महत्व
पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापनाबद्दल जागरूकता वाढवणे, गोड्या पाण्याचे स्रोत जपून आणि योग्य वापर सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी 1992 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत 22 मार्चला जागतिक जलदिन म्हणून घोषित केले. त्यापासून 1993 च्या 22 मार्च हा जलदिन साजरा केला जातो. यावर्षी 2025 ची ‘भविष्यासाठी गोठलेल्या जलस्रोतांचे संरक्षण करणे’ थीम आहे.
- दोन टक्के रेन हार्वेस्टिंग
छत, उद्याने, महामार्ग, मोकळ्dया जागामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी गोळा करून साठवले जाते. या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने भूजल साठवणे किंवा पुनर्भरण करणे यालाच रेन वॉटर किंवा रेनफॉल वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या पाण्याच्या टाकी बांधून रेनवॉटर हार्वेस्टिंग ठरवून करण्याचे प्रमाण जिह्यात फक्त दोन टक्के आहे. कोल्हापुरात सरासरी वर्षाला 1800 मिलीमिटर पावसाची नोंद होते.








