पाण्याअभावी व्यवसायांवर परिणाम : राकसकोप जलाशयाच्या पाणीसाठ्यात घसरण, परिस्थिती गंभीर
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात पाणी समस्या गंभीर बनल्याने कुटुंबासह हॉटेल, व्यावसायिक आणि लहान-मोठ्या उद्योगांनादेखील फटका बसू लागला आहे. राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत घट झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.
राकसकोप आणि हिडकल जलाशयातून शहरातील 58 वॉर्डांतील सुमारे 5.40 लाख घरे, 419 हॉटेल्स आणि 320 लहान-मोठे उद्योग व्यावसायिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. हिडकलमधून दैनंदिन 85 एमएलडी तर राकसकोप जलाशयातून 55 एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. एकूण 140 एमएलडी पाणी शहरात सोडले जाते. मात्र राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने सद्यपरिस्थितीत 15 ते 25 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नसल्याने जलाशयांची पाणीपातळी खालावली आहे. विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पुढील काळात शहरात पाणी समस्या अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2476.25 फुटांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ती 5 फुटांनी कमी झाली आहे. दरम्यान मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पाणीपातळीत आणखी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील भाग्यनगर, अनगोळ, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर, उद्यमबाग, आरपीडी कॉर्नर, रामतीर्थनगर, नेहरुनगर, एपीएमसी मार्केट यार्ड, वीरभद्रनगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, गांधीनगर आदी भागात केवळ दोन तास पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर वीस वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. सार्वजनिक विहिरी आणि कूपनलिकांनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे टँकर चालकांसमोर अडचणी येत आहेत.
पाण्यासाठी भटकंती
पाणी समस्या गंभीर बनल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या टँकरसाठी नागरिकांना 500 ते 600 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक फटकाही बसत आहे. गोरगरीब जनतेला टँकरने पाणी विकत घेणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत नागरिक पाण्यासाठी भटकंती करू लागले आहेत.
आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा…
राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील काही वॉर्डांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र योग्यती खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. आवश्यक त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
– डॉ. रुद्रेश घाळी (मनपा आयुक्त)








