प्रवासी तहानलेले : परिवहनचे दुर्लक्ष, बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ
बेळगाव : हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकात पाणीसमस्या गंभीर बनली आहे. बसचालक, वाहक आणि प्रवाशांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होऊ लागले आहेत. मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानकात पिण्याच्या पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले आहे. पाण्याची वानवा मात्र कायम आहे. मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. कर्नाटक बरोबर शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून येणारे प्रवासी अधिक आहेत. यामध्ये महिला, वयोवृद्ध आणि बालक प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की ही परिस्थिती निर्माण होते. बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. कोट्यावधी रुपये खर्चून मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्थानक उभारण्यात आले आहे.
मात्र दोन्ही बसस्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने वणवण फिरावे लागत आहे. सामान्य प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्याबरोबर सार्वजनिक शौचालयातही पाण्याची कमतरता असल्याने समस्या निर्माण होऊ लागली आहे. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन एका सामाजिक संघटनेने पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे काही प्रवाशांची तहान भागत असली तरी बसस्थानकात पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची गरज आहे. बसस्थानक आवारात पाण्याबरोबरच जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने प्रवाशांना मिळेल ते पाणी घेण्याची वेळ येऊ लागली आहे. तर काही प्रवाशांना तहानलेल्या तोंडानीच प्रवास करावा लागत आहे. बसस्थानक आवारात विविध व्यावसायिकांना गाळे भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत. याठिकाणी विविध खाद्यपदार्थ विक्री केले जातात. मात्र परिवहनने प्रवाशांना पाण्यासाठी कोणतीच व्यवस्था केली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंडही बसू लागला आहे.
तक्रारी वाढल्यास संबंधितांवर कारवाई
मध्यवर्ती बसस्थानकात एका स्वयंसेवी संस्थेला उन्हाळ्यात तीन महिने पिण्याचे पाणी वाटप करण्याची परवानगी दिली आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्लाँटही आहे. प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
– राजेश हुद्दार (विभागीय नियंत्रक अधिकारी)









