सीईओंनी प्रतिसाद दिला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पुन्हा विस्कळीत झाले आहे. दहा ते बारा दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने महिलावर्गाने शुक्रवारी घगरीसह कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आम्हाला पाणी पुरवा, अशी मागणी केली.
कॅन्टोन्मेंटचे पाणीपुरवठा नियोजन मागील सहा महिन्यांपासून कोलमडले आहे. तर सहा महिन्यांत महिलावर्गाने कॅन्टोन्मेंटवर तिसऱ्यांदा घागर मोर्चा काढला. शहरात कूपनलिका आणि विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र कॅन्टोन्मेंट परिसरात पूर्णपणे नळाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. मागील दहा ते बारा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. काही भागात उच्चदाबाने येत नसल्याने मुबलक पाणी मिळत नाही. तर सध्या एलअॅण्डटी कंपनीकडून कॅन्टोन्मेंटला दररोज तीन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी कॅन्टोन्मेंट परिसरातील सर्व रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सदर पाणी अपुरे पडत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करा, अशा मागणीसाठी कॅन्टोन्मेंटवासियांनी कॅन्टोन्मेंट कार्यालयात अनेकवेळा तक्रारी केल्या. पण मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांनी महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट करून जबाबदारी झटकली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची सूचना
आठ दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंट परिसरातील महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडे सध्या पाणीपुरवठा करण्याचा कोणताच अधिकार नाही. महापालिकेने पाणीपुरवठा केल्यानंतरच नागरिकांना पाणी पुरवू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 20 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. सातत्याने विनंती अर्ज करूनदेखील कॅन्टोन्मेंट बोर्डने कोणतीच दखल घेतली नसल्याने अखेर संतापलेल्या महिलावर्गाने शुक्रवारी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर घागर मोर्चा काढून पाण्यासाठी ठाण मांडले. एक तासाच्या प्रतीक्षेनंतरही कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा, असे सांगून बेजबाबदारपणा दर्शविला.
त्यामुळे महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. घागरींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आम्हाला सुरळीत पाणीपुरवठा करा, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, तसेच एलअँण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेण्यात येईल व पाणी समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार मनपा आयुक्त व एलअँण्डटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॅन्टोन्मेंट पाणी समस्येबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सूचना केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









