सातारा :
कास धरण उद्भव योजनेच्या जलवाहिनीला कास गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. पाणी वाया जात असल्याची बाब सातारा नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या निदर्शनास आली आहे. ही गळती काढण्यासाठी आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. या गळतीमुळे दि. 25 जुलै आणि दि. 26 जुलै रोजी सातारा शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा होणार नाही. सातारकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली आहे.
सातारा शहराला सातारा नगरपालिकेच्या कास धरण उद्भव योजनेतून करण्यात येतो. त्या योजनेच्या पाईपलाईनला कास गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पाणी वाया जात असल्याने ही गळती काढण्याचे काम पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांनी पाणी पुरवठा दुरुस्ती पथकास सूचना केल्या आहेत. पथकाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या गळती लागल्यामुळे शुक्रवार दि. 25 रोजी सातारा शहरातील सायंकाळ सत्रातील कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी तसेच डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळेवस्ती, जांभळेवाडा या परिसरातील तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातील सायंकाळ सत्रातील होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
तसेच शनिवार दि. 26 रोजी कास माध्यमातील सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून होणारा यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ या भागातील नागरिकांना तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकी या टाक्यांच्या माध्यमातून वितरण होणाऱ्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तरी कास धरण उद्भव योजनेतून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो त्या भागातील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपरिषदेमार्फत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.








