भाताचा लवलेशही नाही : शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली
वार्ताहर/येळ्ळूर
सर्वत्र भातरोप लागवडीची धावपळ सुरू असून शिवार लागवडीच्या कामामुळे माणसांनी फुलला असताना बळ्ळारी नाला परिसर मात्र चिडीचुप्प असून तेथे निरव शांतता आहे. लागवडीमुळे शिवार हळूहळू हिरवळत असला तरी बळ्ळारी नाला शिवारात वाफ्यातून तुंबलेले पाणी आणि बांधावर गवत वाढले असून भात पिकाचा लवलेशही शिल्लक नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून अशी स्थिती कायम असून शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी सरकारसोबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पण या चर्चेतून आजतागायत काहिच निष्पन्न झाले नाही. प्रत्येकवर्षी शेकडो एकर क्षेत्रावरील पुराच्या तडाख्याने पिके कुजून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
शेतकरी मात्र उघड्या डोळ्यांनी बघण्यावाचून काहीच करू शकत नाही. निसर्गापुढे त्याने हात टेकले असले तरी सरकारने मनात आणले तर निश्चित पुराचा बंदोबस्त होऊ शकतो. पण इच्छाशक्तीचा अभाव म्हणा किंवा अन्य कारणांमुळे जेवढे या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे तेवढे पाहिले जात नाही. आज बळ्ळारी नाला परिसराचे चित्र बघता वाफ्यातून तुंबलेले पाणी त्यावर तरंगणारे शेवाळ आणि बांधावर वाढलेले गवत याशिवाय दुसरे काहिच दिसत नाही. तुंबून राहिलेल्या पाण्याचा निचरा कधी होणार आणि रोपांची पुनर्रलागवड कधी करणार? या विचाराने शेतकरी तळमळतो आहे. सद्यस्थितीत लावणीसाठी तरु उपलब्ध होणे शक्य नसल्याने यावर्षीही शेतकऱ्यांचा खत बी-बियाणे मशागतीचा खर्च डोक्यावर तर बसलाच आहे, पण यावर्षीचे पिकही दिवास्वप्न ठरले आहे.
लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने घ्यावे
पाणी तुंबण्याची मर्यादाही येळ्ळूर सिमेपर्यंत पोहोचून पुन्हा शेकडो एकर क्षेत्रातील पीक पुरामुळे कुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने भविष्यातील अशा अनेक समस्येमुळे शेतकरी आतापासूनच धास्तावला आहे. येळ्ळूर, वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ, धामणे परिसरासह बळ्ळारी नाला काठावरील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सरकारने आतातरी गांभीर्याने या समस्येकडे पहावे एवढीच मागणी शेतकरीवर्ग करतो आहे.









