हॉटेलात आपण प्रामुख्याने खाण्यासाठी जातो, हे प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येक हॉटेलात खाण्यासमवेत पाणीही दिले जाते. तसेच आपली इच्छा असेल तर आपण पेये मागवू शकतो. तथापि, ब्रिटनमधील चेस्टर येथे एक असे हॉटेल आहे, की ज्या स्थानी आपल्याला केवळ विविध प्रकारचे पाणी ‘सर्व्ह’ केले जाते. या हॉटेलात लोक केवळ पाणी पिण्यासाठीच जातात. तेथे अन्य काहीही मिळत नाही, हे वैशिष्ट्या आहे. या हॉटेलचे नाव ‘ला पापोत’ असे असून ते ऐतिहासिक इमारतीत आहे.
येथे भिन्न भिन्न चवींचे पाणी आपल्याला मिळू शकते. मात्र, त्यांच्यात साखर किंवा अन्य द्रव्ये बाहेरुन घातलेली नसतात. तर निसर्गामध्ये जे वेगवेगळ्या चवींचे पाणी उपलब्ध आहे, तेच येथे प्यायला मिळते. पाण्याची चव त्या पाण्यात नैसर्गिकरित्या जे क्षार विरघळलेले असतात, त्यांच्यावर अवलंबून असते. तसेच त्याची चव या क्षारांच्या प्रमाणावरही अवलंबून असते. ‘प्रत्येक गावचे पाणी निराळे’ हा वाक्प्रचार यामुळेच निर्माण झाला आहे. या हॉटेलात अशा प्रकारे जगाच्या विविध भागांमधून आणलेले नैसर्गिक, पण वेगवेगळ्या चवींचे पाणी मिळते.
या पाण्याच्या विविध प्रकारांमधील काही अत्यंत दुर्मिळ असल्याने त्यांची किंमतही प्रचंड असते. येथे एका बाटलीची किंमत 550 रुपये ते 2,100 रुपयांपर्यंत असू शकते. पाण्यात इतके चाखण्यासारखे असते तरी काय आणि इतके महाग पाणी पिण्यासाठी लोक का या हॉटेलात का जातात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण या हॉटेलातील पाणी चाखण्यासाठी गर्दी मात्र असते.
या हॉटेलाची स्थापना करण्याचा हेतू मात्र वेगळा आहे. अलिकडच्या काळात निदान ब्रिटनमधल्या लोकांचे मद्य पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अनेक लोक हॉटेलांमध्ये जाऊन केवळ सोडा किंवा पाणी मागवितात. हा कल पाहून केवळ पाण्याचेच हॉटेल का स्थापू नये, या विचाराने ते मूळ चालकाने स्थापन केले आहे.









