कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
वार्ताहर/कुडची
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कुडची-उगार खुर्द मार्गावरील पुलावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. परिणामी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र व धरण परिसरात पडत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास पुलावर पाणी येण्यास प्रारंभ झाला. सतत वाढणाऱ्या पातळीने बघता बघता पुलावर पाणीच पाणी पसरले. त्यामुळे लागलीच कुडची पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रितम नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बॅरिकेड्स लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसाची नियुक्ती करण्यात आली.
कृष्णा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने पोलिसांनी रस्ता बंद केला. त्यामुळे मिरज, पुणेकडे जाणाऱ्या वाहनधारकांना व कामासाठी जाणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय झाली. अनेक वाहनधारकांना परत जावे लागले. कागवाड-कलादगी या राज्य महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जमखंडी, बागलकोट, बनहट्टी, तेरदाळकडून पुणे, सांगली, मिरजकडे जाणारी वाहने दरूर, अथणी मार्गाने वळविण्यात आली आहेत. तर रायबागकडून येणारी वाहतूक अंकली मार्गाने वळविण्यात आली आहे. हा मार्ग बंद झाल्याने लोकांची गर्दी रेल्वेस्थानकावर रेल्वेने प्रवास करण्याकरिता वाढत असून मिरज व सांगली या भागाला अनेक लोक व्यापार, दवाखाना व कामाकरिता जातात. त्यांना रेल्वेचा प्रवास उपयुक्त असून कुडची रेल्वे स्थानकावर पॅसेंजर व काही जलद गाड्यांना थांबा आहे. अन्य काही जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
तालुक्यातील नदी काठावर येणाऱ्या गावात नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याबरोबर तेथील तलाठी, पंचायतीचे कार्यदर्शी यांना गावातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांनी गावातील लोकांशी संपर्क साधावा. समस्या उद्भवली तर तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आल्याचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी सांगितले.









