जलमार्गमंत्री सुभाष फळदेसाई यांचा कोची दौरा केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्याशी फलदायी चर्चा
सांगे : गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून गोवा सरकारचे अंतर्गत जलमार्गमंत्री सुभाष फळदेसाई आणि केंद्रीय जहाजबांधणी आणि बंदरे खात्याचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची ग्रँड हयात, कोची येथे सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्यात गोवा वॉटर मेट्रो टॅक्सीच्या व्यवहार्यतेबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी सोनोवाल यांनी या प्रस्तावाला सकारात्मक उत्तर दिले आणि अंमलबजावणीच्या पुढील टप्प्यांसाठी पुढे जाण्यास सांगितले. यावेळी कोची रेल मेट्रो मुख्यालयात कोची रेल मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली. त्यांनी आम्हाला गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्प कसा राबवायचा याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या संचालकांच्या टीमने आम्हाला फोर्ट कोची येथे वॉटर मेट्रो टॅक्सीचा दौराही घडवून आणला. यावेळी त्यांनी संपूर्ण पट्ट्यात वापरले जाणारे तंत्रज्ञान दाखवले तसेच त्याच्या अंमलबजावणीविषयी विस्तृत माहिती दिली, असे फळदेसाई यांनी सांगितले.
मंत्री फळदेसाई यांनी ही बैठक गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्र्यांना प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली असता त्यांनी पुढे जाण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही प्रत्यक्ष वॉटर मेट्रो टॅक्सीची पाहणी केली आहे आणि फिरून आलो आहोत. सदर प्रकल्प राबविण्यासाठी गोवा हे आदर्श ठिकाण असून पहिल्या टप्यात गोव्याचा प्रकल्प घेण्याचे मंत्री सोनोवाल यांनी मान्य केले आहे. यापूर्वी आपण दोन वेळा मंत्री सोनोवाल यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्याअनुषंगाने कोची येथील ही बैठक आणि भेट हा पाठपुराव्याचा भाग होता. पहिल्या टप्यात तीन राज्यांतील प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. त्यात गोव्याचा क्रमांक लागणार आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.









