बेळगाव : ज्योतिर्लिंग गल्ली, दुसरा क्रॉस कणबर्गी येथे गटारी नसल्याने पावसाचे व सांडपाणी रस्त्यावर तुंबून राहत आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवासी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. तुंबलेल्या पाण्यातूनच पादचारी व वाहनचालकांना ये-जा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून तातडीने गटारींचे काम करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. कणबर्गी गावातील विविध समस्यांकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावातील समस्या सोडविण्यासंदर्भात यापूर्वीच माजी महापौर शिवाजी सुंठकर, एसडीएमसी अध्यक्ष किसन सुंठकर यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
त्यानंतर तातडीने हेस्कॉम व महापालिकेकडून काही समस्या मार्गी लावण्यात आल्या. पण ज्योतिर्लिंग गल्ली दुसरा क्रॉस येथे गटारी बांधण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. गटारीअभावी पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच तुंबून राहत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हेतर तुंबलेल्या पाण्यातूनच रहिवाशांना ये-जा करावी लागत आहे. एखाद्यावेळी भरधाव वाहन तेथून गेल्यास पाणी नागरिकांच्या अंगावर उडण्यासह स्थानिक रहिवाशांच्या घरामध्ये शिरत आहे. या समस्येकडे मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गटारींची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे.









