चिपळूण :
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून तालुक्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे कोणताही धोका नसला तरी विरेश्वर परिसरात झाड पडून २ दुकानांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रात्रभर पडणाऱ्या या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या व अनेक दिवस कोरड्या पडलेल्या वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. वाशिष्ठी नदीवरील बाजारपूलाला पाणी चाटून जात आहे. तिची इशारा पातळी ५ मीटरची असताना ती सकाळी ४.०४ मीटरपर्यंत गेली होती. मात्र दुपारी पावसाने विश्रांती घेतल्याने कोणताही धोका झाला नाही. यामुळे पाणीपातळीत घट होत होती. सायंकाळी भरती लागल्याने या पातळीत थोडी वाढ झाली. येथील परिस्थितीवर प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, एनडीआरएफचे प्रमुख प्रमोद रॉय, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी संपूर्ण शहराची पाहणी केली. पावसामुळे मंगळवारी पहाटे विरेश्वर परिसरात मोठे झाड पडून शारदा सीताराम माने यांच्या मालकीच्या सलूनचे ७ हजार ५०० रुपये, श्याम बंडू तावडे यांच्या माडी दुकानाचे ४१ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. ही माहिती मिळताच नगर परिषदेच्या उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांनी अन्य कर्मचारी व यंत्रसामुग्रीसह येथे तत्काळ येऊन झाड बाजूला केले. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ९ ठिकाणच्या ९ बोटींवरील चालक तैनात करण्यात आले आहेत.








