पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे प्रवाहाला सुरुवात
बेळगाव : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने जलाशयाच्या पाणीपातळीत एक इंचाने वाढ झाली आहे. तसेच आठ दिवसांत 244.04 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सध्या 2454.40 फूट पाणीसाठा राकसकोप जलाशयात आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
उसंत न घेता पावसाची रिपरिप सुरूच असल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात जमिनीत ओलावा निर्माण झाला असल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. काही ठिकाणी मशागती करण्यापूर्वीच पावसाच्या भीतीने पेरणीची कामे उरकली जात आहेत. विशेषकरून बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील शेतकरी दरवर्षी धूळवाफ पेरणी करतात. मात्र, यंदा पेरणीसाठी हंगाम मिळाला नाही. सततच्या पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर येईल, या भीतीने तेथील शेतकरी घाईघाईने पेरणीचे काम उरकून घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, कूपनलिका आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात गतवर्षी 2454.45 फूट इतका पाणीसाठा होता. रविवार दि. 25 मे रोजी 2454.35 फूट इतका पाणीसाठा होता. सोमवारी यामध्ये एक इंचाने वाढ झाली असून सध्या 2454.40 इतका पाणीसाठा जलाशयात आहे. गेल्या आठ दिवसांत 244.04 मि.मी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पावसानेच नदी-नाले व जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने मान्सूनमध्ये आणखी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता कमी आहे.









