शेकडो लिटर पाणी वाया : उपनोंदणी कार्यालयासमोर साचले तळे
बेळगाव ; ठिकठिकाणी पाणी गळती ही नित्याची बाब बनली आहे. याबाबत वारंवार आवाज उठवा किंवा फोन करून सांगा. तरी पाणीपुरवठा कंपन्यांनी दुर्लक्ष केले आहे. सध्या नगरविकास खात्याच्या कार्यालयासमोर पाणी गळती लागली असून त्याचे संपूर्ण पाणी उपनोंदणी कार्यालयासमोर साचून आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून ही गळती काढावी, अशी मागणी होत आहे.
बेळगावातील मुख्य कार्यालय म्हणून उपनोंदणी कार्यालयाकडे पाहिले जाते. या कार्यालयातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. तर नगरविकास खातेही महत्त्वाचे असून त्याच्यासमोरच गळती लागली आहे. या गळतीचे पाणी उपनोंदणी कार्यालयाकडून वाचनालयासमोरील गटारी अथवा रस्त्यावर जात आहे. दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तालुका पंचायतसमोरच एक गळती लागली असताना आता केवळ 50 फुटाच्या अंतरावर दुसरी गळती लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारी कार्यालयांसमोरच अशी अवस्था आहे तर शहराचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उपनोंदणी कार्यालयासमोर नागरिकांची मोठी गर्दी असते. याठिकाणी पाणी साचून राहिल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. या पाण्यातून ये-जा करणे कठीण बनत आहे. दरम्यान एखादे वाहन यामधून आल्यास ते पाणी इतरांवर उडत आहे. त्यामुळे येथील गळती काढण्याची नितांत गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









