अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेकडो लिटर पाणी वाया
बेळगाव : तालुका पंचायतसमोर मागील काही महिन्यांपासून पाणी गळती लागली आहे. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले असून तातडीने पाणी गळती काढावी व होणारा पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी होत आहे. बेळगाव तालुक्याचा कारभार चालविणारे कार्यालय म्हणून तालुका पंचायतीकडे पाहिले जाते. यावर्षी 300 हून अधिक टँकर पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याचे महत्त्व माहिती असूनदेखील कार्यालयासमोरील पार्किंगच्या ठिकाणी पाणी गळती लागली आहे. मात्र याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील गळती काढण्यासाठी आता जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वाढली आहे. कामानिमित्त या ठिकाणी दररोज नागरिकांची ये-जा असते. मात्र गळती लागलेले पाणी परिसरातच पसरत असल्याने याचा त्रास नागरिकांनाही होत आहे. दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात असून येथूनच अधिकारी ये-जा करत असतात. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा येथील अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला माहिती देऊन गळती काढण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा ही गळती थांबविण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.









