आंबेवाडीतील विहीर म्हणजे पाणी साठवणीचा चिरेबंदी वाडाच
सुधाकर काशीद/कोल्हापूर
पाण्याची टंचाई भासू लागल्यावर पाण्याच्या थेंबाचे महत्त्व क्षणाक्षणाला जाणवू लागते. मग तहान लागल्यावर विहीर खोदायची, या म्हणीचा प्रत्यय येऊ लागतो. पण करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील पाटील बंधूंच्या विहिरीत बारा महिने पाणी असतानाही विहिरीतील थेंब आणि थेंब पाणी जपले जाते. एवढेच नव्हे तर त्या विहिरीत झाडाचे एक पान किंवा कागदाचा साधा कपटा जरी पडला तरी त्याला लगेच बाहेर काढले जाते. विहीर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर विहीर आरशासारखीच स्वच्छ ठेवली जाते. पाण्याचे महत्व किती आहे, हे व्याख्यान देऊन सांगत बसण्यापेक्षा पाटील बंधूंकडून विहिरीतल्या प्रत्येक थेंबाला जपले जात आहे.
आंबेवाडीतील पाटील बंधूंच्या मळ्dयात असलेली ही विहीर म्हणजे मातीतून झिरपणाऱ्या पाण्याचा दगडी कोंदणात जपलेला अमूल्य असा ठेवा आहे. साधारण दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीची ही विहीर म्हणजे पाणी साठवण्याचा अतिशय भक्कम आणि देखणा खजिना आहे. विहीर घडीव दगडाने बांधलेली आहे. विहिरीत उतरण्यासाठी दगडी कमानीच्या पायऱ्या आहेत. ही विहीर एखाद्या चिरेबंदी वाड्यासारखे रूप घेऊन उभी आहे. वाड्यात बारा महिने ताजातवाना पाण्याचा जिवंत आहे.
वास्तविक, विहिरीचे पाणी कधी मोठ्या फरकाने कमी होत नाही. त्यामुळे पाटील बंधूनी विहीर कशीही वापरली असती तरी चालले असते. पण पाण्याच्या थेंबा-थेंबाचे महत्त्व त्यांना माहीत असल्याने त्यांनी विहिरीची नित्य स्वच्छता ठेवली आहे. विहिरीच्या काठावर कोणाला धुणंभांडी करू दिले जात नाही. झाडाचे वाळलेले पान जरी वाऱ्याने विहिरीत पडले तरी ते तात्काळ बाहेर काढले जाते. त्यामुळे विहिरीत नितळ पाण्याशिवाय अन्य काहीही दिसत नाही. काठावरून विहिरीत पाहिले तर आरशासारखे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसते. ही विहीर म्हणजे विहीर बांधकाम शैलीचेही एक वेगळे उदाहरण आहे.
पाटलांचा एखादा वाडा चिरेबंदी असतो, पण विहीरही कशी चिरेबंदी असू शकते, याचे विहीर याचे ही विहीर एक प्रतीक आहे. या विहिरीत पोहायची इच्छा अगदी सहज होते आणि अलीकडच्या काळात तर सेल्फी फोटोसाठी ही विहीर सर्वांना आकर्षित करते, त्यामुळे विहिरीवर फोटोशूट कायम सुरू असते. पावसाळ्dयात ही विहीर पंचगंगेच्या महापुराने वेढलेली असते. विहिरीच्या वर पाच ते सहा फूट पाणी असते. ही विहीर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी पाटीलबंधू प्रयत्न करतात. पाणी नसल्यावर पाणी जपण्याच्या चर्चा करण्याऐवजी आपल्याकडे आहे ते पाणी एक थेंब वाया जाणार नाही, याची खबरदारी ते घेतात आणि त्या विहिरीचे महत्त्व ते अधोरेखित करत असतात.
पाण्याच्या थेंबाथेंबाचे महत्त्व अनेकवेळा सांगितले जाते. त्याचा साठा करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. पण पाणी साठवण्याची जाणीव मला मनातच जपली जाण्याची गरज आहे आणि त्याचे प्रतिक ही विहीर आहे.








