ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : आंबेवाडी ग्रा. पं.चे दुर्लक्ष
वार्ताहर/उचगाव
आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गोजगे या गावातील ग्रामपंचायतने गटारींची स्वच्छता न केल्याने, गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गटारी तुंबल्या आहेत. गटारीशेजारीच कूपनलिका असून गटारीतील पाणी झिरपत आहे. या कूपनलिकेचेच पाणी गावातील नागरिक पिण्यासाठी उपयोग करत असल्याने सदर पाणी पिऊन गावातील नागरिकांच्या आरोग्यात बिघाड झाला आहे. अनेक नागरिक आजारी असल्याचे चित्र गावात दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोजगे गाव आंबेवाडी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येते. गोजगे गावातील गटारीची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते.
मात्र ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व गटारी पावसाचे पाणी आणि लोकांच्या ड्रेनेज तसेच सांडपाण्यामुळे तुडुंब भरून पाणी रस्त्यावर वाहत होते. सदर पाणी सध्या या गटारीतच साचून आहे. या गटारीलगतच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून कूपनलिका खोदण्यात आली आहे. सदर कूपनलिकेवरती मोटर बसवून त्याच ठिकाणी पाण्याची टाकीही उभारण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी पाणी वापरले जाते. सदर गटारीमध्ये तुंबलेले पाणी कूपनलिकेखाली झिरपत गेल्याने सदर पाणी सध्या दूषित बनले आहे. हे पाणी नागरिकांनी पिण्यासाठी उपयोग केल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचला आहे.
गढूळ-जंतूमिश्रित पाणी
सध्या या कूपनलिकेला गढूळ व जंतूमिश्रित पाणी येत आहे. आणि गावातील नागरिक सदर पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी आंबेवाडी ग्रामपंचायतने तातडीने गटारींची स्वच्छता करावी आणि कूपनलिकेचीही स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









