वार्ताहर /किणये
तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. राकसकोप धरणातील दरवाजे उघडल्यामुळे मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोनोली-कुद्रेमनी फाटा रस्त्यावर असलेल्या मार्कंडेय नदीच्या पुलाजवळील शेत शिवारात पाणी शिरले आहे. नदीकाठावर असलेल्या भात व ऊस पिकामध्ये नदीचे पाणी गेले आहे. त्यामुळे सोनोली गावातील भातपीक पाण्याखाली गेले आहे. तसेच ऊस पिकातही पाणी शिरले आहे. सध्यातरी या पाण्याचा ऊस पिकांना अधिक धोका नाही. मात्र भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे ते कुजून जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सोनोली गावातील काही शेतकऱ्यांनी दिली आहे. काही शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली होती. यातील भातपीक बऱ्यापैकी बहरुन आले होते.बहुतांश शेतकऱ्यांनी रोप लागवड केलेली आहे. मात्र नदीचे पाणी या भात पिकात गेले आहे. त्यामुळे रोप लागवड पुन्हा करावी लागणार का? या चिंतेत शेतकरी आहेत.









