गटार बुजल्याने समस्या : खुली करण्याची मागणी
बेळगाव : तालुका पंचायतसमोर थोडासाही पाऊस झाला तर पाणी साचून राहात आहे. त्यामुळे येथील समस्या निवारण्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. येथील बुजलेल्या गटारी तातडीने खुल्या केल्यास सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे आता याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. कार्यालयासमोरच पाणी साचून राहिल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. तालुका पंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र याकडे कानाडोळा करण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयासमोर वाहने पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान काही दिवसांपासून येथे पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे अधिकारी व कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तरी येथील पाणी निचरा होण्यासाठी योग्य ते पावल उचलावे, अशी मागणी होत आहे.









