अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची मंत्री हेब्बाळकर यांची माहिती
बेळगाव : मलप्रभा जलाशयातून कालव्यांद्वारे मुबलक पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मलप्रभा पाटबंधारे योजना सल्ला समितीच्या अध्यक्षा तथा महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 1 मार्चपर्यंत कालव्यांद्वारे पाणी सोडण्याचे तयारी केली आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या आमदार, महामंडळ अध्यक्ष, शेतकरी नेते यांच्या संयुक्त बैठकीमध्ये मलप्रभा धरणातून कालव्यांद्वारे पाणी सोडण्याची चर्चा झाली होती.
जलाशय पूर्ण भरलेले असून 2024-25 च्या खरीप हंगामासाठी 14.87 टीएमसी व रब्बी हंगामासाठी 16 टीएमसी या प्रमाणे एकूण 30.87 टीएमसी पाणी जलसिंचनासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मलप्रभा जलाशयामार्फत जलसिंचन करणाऱ्या कालव्यांद्वारे 14 फेब्रुवारीपर्यंत 16 टीएमसी पाणी सोडले आहे. सध्या दोन्ही हंगाम पूर्ण झाले असले तरी नरगुंद आणि बदामी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्यांमार्फत 15 मार्चपर्यंत पाणी सोडण्याची मागणी मंत्री हेब्बाळकर यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रतिसाद देत 15 फेब्रुवारी ऐवजी 1 मार्चपर्यंत कालव्यामार्फत पाणी सोडण्यात येईल असे स्पष्ट केले.
याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी जून अखेरपर्यंत 15 टीएमसी पाणी साठवून ठेवून मागणीनुसार पुरवठा करण्याची सूचना हेब्बाळकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना केली आहे. येत्या 1 मार्चपूर्वी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी, लघु पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांनी संयुक्तपणे चर्चा करून पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील तलाव भरणीचे काम हाती घ्यावे, अशी सूचनाही हेब्बाळकर यांनी केली आहे.यंदा उन्हाळा तीव्र असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी अधिक असेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरता वापर करावा, अपव्यय करू नये, असे आवाहन मलप्रभा पाटबंधारे योजना सल्ला समितीचे सदस्य सचिव व नवीलतीर्थचे अधीक्षक अभियंता व्ही. एस. मधुकर यांनी केले आहे.









