एलअँडटीकडून पाणी परीक्षण : पाणी पिण्याआधी चाचणी करणे गरजेचे
बेळगाव : उष्णतेत मोठी वाढ होत असतानाच दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनत चालला आहे. नळांना 10 ते 15 दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने बेळगावकर कूपनलिका आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, कूपनलिका आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल एलअँडटी कंपनीने दिला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांमध्ये 850 कूपनलिकांचे पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 786 कूपनलिकांचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे सदर पाणी पिण्यायोग्य नसून आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. एलअँडटीने दिलेल्या या अहवालामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या गांधीनगर, रामतीर्थनगर, महांतेशनगर, नेहरूनगर, हनुमाननगर, अंजनेयनगर, वीरभद्रनगर, राणी चन्नम्मानगर, हिंदवाडी, अनगोळ, भाग्यनगर, शहापूर, वडगाव, सुभाषनगर, आंबेडकरनगर, अशोकनगर, बसवनगर, उद्यमबाग, ऑटोनगर, कॅम्प भागातील विविध भागांमध्ये मोठ्या संख्येने विहिरी आणि कूपनलिका आहेत. तसेच त्या ठिकाणचे पाणी बांधकामासाठी तसेच विक्री करण्यासाठी देखील वापरले जाते. तर दररोज आठ ते दहा नवीन कूपनलिका व विहिरी खोदल्या जात आहेत. त्यामुळे कूपनलिका किंवा विहिरींचे पाणी पिण्यापूर्वी त्याची चाचणी करणे गरजेच बनले आहे.
गटारी आणि ड्रेनेजचे पाणी व्यवस्थितरित्या निचरा होत नसल्याने हे पाणी झिरपून कूपनलिका आणि विहिरींचे पाणी दूषित बनत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन सांडपाण्याचा व्यवस्थितरित्या निचरा व्हावा, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्याची चाचणी कटाक्षाने करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गटारी, ड्रेनेजच्या पाण्यामुळे समस्या
शहरातील 786 कूपनलिका, 18 विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल एलअँडटी अधिकाऱ्यांनी दिला आहे. गटारी आणि ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी झिरपत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
– शुभा बी. (महापालिका आयुक्त)









